मोतसावंगा धरणातील जलसाठय़ाच्या पातळीत घट
By Admin | Updated: October 23, 2014 00:48 IST2014-10-23T00:19:20+5:302014-10-23T00:48:55+5:30
मंगरुळपीर तालुक्यातील अडाण नदीवरील प्रकल्पातून होतो २१ गावांना पाणीपुरवठा.

मोतसावंगा धरणातील जलसाठय़ाच्या पातळीत घट
सायखेडा (मंगरुळपीर, जि. अकोला): मंगरुळपीर तालुक्यातील अडाण नदीवरील मंगरुळपीर शहरासह २१ गावांना पाणीपुरवठा करणार्या मोतसावंगा धरणातील जलसाठय़ात हिवाळय़ाच्या दिवसांतच घट झाल्याचे दिसत आहे.
मोतसावंगा प्रकल्प हा तालुक्यातील महत्त्वाचा जलप्रकल्प आहे. या प्रकल्पावर शेकडो हेक्टर जमिनीचे सिंचन होत, तसेच मंगरुळपीर शहरासह २१ खेड्यांना पाणीपुरवठा केला जातो. गतवर्षी अनियमित पावसाळा झाला होता; परंतु जलसाठे तुडुंब भरले होते.
त्यावेळी या प्रकल्पास १00 टक्के जलसाठा भरला होता. मात्र, यावर्षी अत्यल्प पावसामुळे धरणात शंभर टक्के जलसाठाच झाला नाही. मोतसावंगा धरणाची निर्मिती परिसरात सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, या हेतूने १९७१-७२ साली करण्यात आली होती.
या प्रकल्पामुळे परिसरातील मोतसावंगा, निंबी, मानोली, गोलवाडी येथील शेकडो हेक्टर शेती सिंचनाखाली आली आहे. परंतु, प्रत्यक्षात जलपातळी खालावल्यामुळे सिंचनाच्या मुख्य उद्देशाला बगल मिळत् आहे. पाण्याचा वापर योग्य प्रमाणातच करणे गरजेचे आहे; अन्यथा पाणीटंचाईला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.