गतवर्षीच्या पावसाळ्यात वाशिम जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत मंगरुळपीर येथे अधिक पाऊस पडला. त्यामुळे या तालुक्यातील १५ प्रकल्प काठोकाठ भरले. तथापि, आसेगाव परिसरात पुरेसा पाऊस झाला नाही, तर परतीच्या पावसाचाही फारसा आधार न झाल्याने आसेगाव येथील बांधात केवळ ७८ टक्के जलसाठा झाला होता. त्यामुळे या बांधातील पाणी वापराचे नियोेजन करणे आवश्यक आहे; परंतु परिसरात यंदा रब्बी पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांकडून सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात उपसा केला जात आहे. त्यात हा उपसा अनियंत्रित असल्याने पाण्याचा प्रत्यक्ष फायदा होण्याऐवजी अपव्यय होत असल्याने आसेगाव बांधातील पाणीपातळीत झपाट्याने घट होत असल्याचे दिसत आहे. सद्य:स्थितीत बांधात ६० टक्के साठा उरलेला नाही. त्यामुळे यंदाही परिसरात पाणीटंचाईची समस्या उद्भवण्याची भीती आहे.
आसेगाव बांधातील पातळीत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:11 IST