अमरावती विभागात दुग्धव्यवसायाला उतरती कळा
By Admin | Updated: August 6, 2015 00:45 IST2015-08-06T00:45:35+5:302015-08-06T00:45:35+5:30
जिल्हे पाच; दूध शीतकरण केंद्रे तीन!

अमरावती विभागात दुग्धव्यवसायाला उतरती कळा
सुनील काकडे / वाशिम : दरवर्षीच अस्मानी-सुल्तानी संकटांचा सामना करणार्या शेतकर्यांना जनावरांची देखभाल करणेही कठीण जात असून, शासनाच्या दुग्धव्यवसाय विकास विभागाकडूनही त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे दुरापास्त झाल्याने दुग्धव्यवसायाला उतरती कळा प्राप्त झाली आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये असलेल्या ११ दूध शीतकरण केंद्रांपैकी तब्बल आठ केंद्रे विविध कारणांमुळे बंद पडल्यावरून ही बाब अधोरेखित होत आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्येदेखील शासकीय दूध शीतकरण केंद्रे उघडण्यात आली. त्यात अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, अचलपूर, चांदूररेल्वे, सेमाडोह, वाशिम जिल्ह्यातील वाशिम, कारंजा, यवतमाळातील पुसद, ढाणकी, पांढरकवडा, मारेगाव आणि बुलडाणा जिल्ह्यातील चिखली, मोताळा या गावांचा समावेश आहे. तथापि, शासकीय दूध शीतकरण केंद्रांमध्ये शुद्ध दूध दिल्यानंतरही त्यास मिळणारा अल्प दर, जनावरांना लागणारा चारा तथा इतर खाद्यांचे वधारत चाललेले दर यांसह इतर विविध समस्यांमुळे दुग्धव्यवसायाने नफ्याऐवजी तोटाच अधिक झाल्याने शेतकरी, पशुपालकांनी शासकीय दूध शीतकरण केंद्रांकडे पाठ फिरवली आहे. सध्या अमरावती जिल्ह्यातील चांदूररेल्वे येथील शासकीय दूध शीतकरण केंद्रामध्ये दैनंदिन १000 लिटर, वाशिम येथे ७00 लिटर; तर धनकी येथील केंद्रावर प्रतिदिन ४00 लिटर दूध संकलित केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.