गणित, भौतिकशास्त्राला वगळण्याचा निर्णय अयोग्यच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:40 IST2021-03-21T04:40:28+5:302021-03-21T04:40:28+5:30
गेल्या आठवड्यात, एआयसीटीईने पदव्युत्तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रता निकषांमध्ये बदल केला. गणित, भौतिकशास्त्र हे विषय अकरावी, बारावीच्या स्तरावर अभ्यासण्याचे ...

गणित, भौतिकशास्त्राला वगळण्याचा निर्णय अयोग्यच!
गेल्या आठवड्यात, एआयसीटीईने पदव्युत्तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रता निकषांमध्ये बदल केला. गणित, भौतिकशास्त्र हे विषय अकरावी, बारावीच्या स्तरावर अभ्यासण्याचे बंधन शिथिल करून तीन विज्ञान विषय घेऊन बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अभियांत्रिकी प्रवेशाची मुभा दिली. या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. यानंतर परिषदेने पात्रता निकष निश्चित करण्याची जबाबदारी राज्यांवर किंवा विद्यापीठांवर सोपवली. मात्र, नियम पूर्णपणे मागे घेतला नाही. त्यामुळे राज्यांनी स्वीकारल्यास बारावीला गणित आणि भौतिकशास्त्र न घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीला प्रवेश मिळू शकतो. एआयटीए संस्थेने आता १४ विषयांची यादी जाहीर केली असून, अभियांत्रिकी प्रवेशासाठी यादीतील १४ पैकी कोणत्याही तीन विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी किमान ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यात गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती व तंत्रज्ञान, जीवशास्त्र, इन्फॉर्मेशन प्रॅक्टिस, जैवतंत्रज्ञान, टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट, इंजिनीअरिंग ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज् आणि उद्योजकता या विषयांचा समावेश असेल. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी एआयटीने एक हँडबुक जारी केले असून, त्यातही याबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे.
--------
बॉक्स : अभियांत्रिकीचे बेसिक शिक्षणच मिळणार नाही
‘बायोमेडिकल’ अभियांत्रिकी आणि बायोटेक्नॉलॉजीसारख्या अभियांत्रिकी शाखांनाही गणित आणि भौतिकशास्त्र यांचे ज्ञान आवश्यक आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेश करणाऱ्यांसाठी गणित, फिजिक्स, केमिस्ट्री विषय बंधनकारक नसणे हे धोकादायक ठरू शकते; कारण यामुळे विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचे बेसिक शिक्षणच मिळणार नाही, अशी भीती शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
-------------
कोट : अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी गणित आणि भौतिकशास्त्राचा सखोल अभ्यास महत्त्वाचा असतो. त्यामुळेच हे विषय शालेय स्तरावर अभ्यासणे अत्यावश्यकच आहेत, ‘एआयसीटीई’चा निर्णय हा मागे घेऊन जाणारा आणि चुकीचा आहे. अभियांत्रिकीचे नियमित विषय आणि गणित, भौतिकशास्त्राचे मार्गदर्शन वर्ग एकावेळी करणे शक्य नाही.
- अंबादास मानकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
----------------
कोट : विज्ञान-तंत्रज्ञान शाखांबाबतचा दृष्टिकोन अद्ययावत करण्याची गरज आहे. डॉक्टर्सही गणिताचा अभ्यासू करतात. जीवशास्त्रात काम करायचे मग गणित का अभ्यासू, अशी भूमिका नुकसान करणारी आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण एक वर्ष गणित आणि भौतिकशास्त्राचा पाया पक्का करण्यासाठी राखून ठेवले तरच हा निर्णय योग्य ठरेल.
- रमेश तांगडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
----------
कोट : अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची भीती दूर करण्यासाठी आणि प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी हा निर्णय एआयटीने घेतल्याचे सांगितले जाते; परंतु अकरावी-बारावीला भौतिकशास्त्र व गणिक हे विषय न घेणारे विद्यार्थी अभियांत्रिकी प्रवेशाकडे वळत नाहीत. त्यामुळे या निर्णयाचा अभियांत्रिकीच्या प्रवेशावर कोणताही परिणाम होणार नाही.
- सुनील कळमकर, कार्यकारी अभियंता
----------------------
कोट : अकरावी-बारावीत भौतिकशास्त्र आणि गणित विषयाच्या मूलभूत संकल्पनांचा अभ्यास झाल्याचे गृहीत धरूनच विद्यापीठाकडून अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम तयार केला जातो; मात्र एआयटीएच्या निर्णयामुळे पुढील काळात विद्यापीठाला अभ्यासक्रमाबाबत वेगळा विचार करावा लागेल.
- वैशाली वायचाळ, शिक्षणतज्ज्ञ
-----