मृगधारा बरसल्या
By Admin | Updated: June 9, 2015 02:09 IST2015-06-09T02:09:43+5:302015-06-09T02:09:43+5:30
शेतकरी आनंदला; वाशिम जिल्ह्यात पावसाचे आगमन.

मृगधारा बरसल्या
कारंजा लाड (जि. वाशिम): मृग नक्षत्राच्या पर्वावर वाशिम जिल्हय़ात रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. जवळपास अर्धा ते एक तास सतत बरसलेल्या मृगधारांनी गर्मीच्या त्रासापासून दिलासा मिळाल्याने लोक सुखावले. मृग नक्षत्राच्या दुसर्या दिवशी वरूणराजाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गही आनंदला आहे. हवामान खात्याने पावसाचे आगमन उशिरा होण्याचा अंदाज वर्तविला होता; मात्र सोमवारी रात्री वाशिम जिल्हय़ातील कारंजा, मानोरा मंगरुळपीर, मालेगाव, वाशिम व रिसोड तालुक्यात पावसाचे दमदार आगमन झाले. रविवारी मध्यरात्रीपासून या पाचही तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सोमवारी सकाळीही ढग दाटल्याने पाऊस पडण्याची शक्यता वाटत होती; परंतु दुपारच्या सुमारास उन्हाचा कडाका वाढला आणि ढगाळ वातावरण निवळले; परंतु सायंकाळच्या सुमारास पुन्हा ढग दाटून आले आणि रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहिसा दिलासा मिळाला. अनेकांनी या पावसाचा मनमुराद आनंद लुटला. मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथे विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. वाशिम येथे ९.३0 वाजतापासून पावसाने जोरदार हजेरी लावली. वृत्त लिहिस्तोवर जोरदार पाऊस सुरुच होता. शेतकरी वर्गात या पावसाने मोठा उत्साह संचारला आहे.