‘पात्र शेतक-यांना ३१ मेपूर्वी कर्जवाटप करा!’
By Admin | Updated: March 30, 2017 02:41 IST2017-03-30T02:41:22+5:302017-03-30T02:41:22+5:30
खरीप हंगाम पीक कर्ज वाटप पूर्वतयारी बैठकीज किशोर तिवारी यांच्या सूचना.

‘पात्र शेतक-यांना ३१ मेपूर्वी कर्जवाटप करा!’
वाशिम, दि. २९- आगामी खरीप हंगामाकरिता पीक कर्ज वाटपाचे बँकनिहाय उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे. त्यानुसार सर्व पात्र शेतकर्यांना ३१ मे २0१७ पूर्वी पीक कर्जाचा लाभ देण्यासाठी बँकांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी झालेल्या खरीप हंगाम पीक कर्जवाटप पूर्वतयारी बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, वाशिमचे उपविभागीय अधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. बी. पटेल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक विजय खंडरे यांच्यासह सर्व तहसीलदार व बँक अधिकारी उपस्थित होते.
तिवारी पुढे म्हणाले, की प्रत्येक पात्र शेतकर्याला पीक कर्ज देण्यासाठी बँकांनी सकारात्मक रहावे. १ एप्रिल ते ३१ मे २0१७ या कालावधीत सर्व बँकांनी आपल्याला देण्यात आलेले पीक कर्ज वाटपाचे ११५0 कोटी रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. शेतकर्यांची गैरसोय टाळण्यासाठी, तसेच त्यांना योग्य माहिती मिळावी, याकरिता सर्व बँकांनी दर्शनी भागामध्ये पीक कर्ज वाटप सुरू असल्याचे फलक लावावेत. या फलकावर पीक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती द्यावी. कोणताही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये, याची दक्षता सर्व बँक अधिकार्यांनी घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले, की पावसाळा सुरु होण्यापूर्वी शेतीतील कामे पूर्ण करणे व बियाणे खरेदी करण्याकडे शेतकर्यांचा कल असतो. त्यांना वेळेत कर्ज उपलब्ध झाल्यास ते खासगी सावकाराकडे जाणार नाहीत. त्यामुळे बँक अधिकार्यांनी एप्रिल, मे महिन्यात पूर्ण क्षमतेने काम करून पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. यावर्षी दीड लाख शेतकर्यांना कर्जाचा लाभ देण्याचे नियोजन असल्याचे ते म्हणाले.