घाटा येथील ‘त्या’ युवकाचा घातपात की मृत्यू?
By Admin | Updated: March 4, 2016 02:09 IST2016-03-04T02:09:15+5:302016-03-04T02:09:15+5:30
ग्राम घाटा येथील २६ फेब्रुवारी रोजी एका शेतात मृतदेह आढळून आला होता.

घाटा येथील ‘त्या’ युवकाचा घातपात की मृत्यू?
शिरपूर: शिरपूरजैन येथून जवळच असलेल्या ग्राम घाटा येथील १७ वर्षीय मुलाचा २६ फेब्रुवारी रोजी एका शेतात मृतदेह आढळून आला होता. त्याचा दफनविधी त्याच दिवशी करण्यात आला; परंतु कुटुंबीयांनी त्याच्या मृत्यूच्या कारणाबाबत शंका उपस्थित करून दफन केलेल्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात यावे, अशी मागणी शिरपूर पोलिसांकडे गुरूवारी केल्याने युवकाचा मृत्यू झाला की घातपात आहे, याबाबत चर्चा सुरू आहे. घाटा येथील शे. युसूब शे. अयुब हा १७ वर्षीय मुलगा २६ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३0 वाजता बकर्या चारण्यासाठी शेतात गेला होता. त्याचा मृतदेह त्याच दिवशी रात्री ११ वाजता एका शेतात आढळून आला. त्याचे मृतदेहाचे दफन करण्यात आले; परंतु त्यांच्या कुटुंबीयांनी २ मार्च रोजी युसूबचा मृत्यू नैसर्गिक नसून, त्याचा घातपात झाल्याची शंका उपस्थित करून दफन केलेले युसूबचे प्रेत पुन्हा वर काढून त्याचे शवविच्छेदन करावे, अशी मागणी केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक हरीश गवळी यांनी तहसीलदार मालेगाव, उपविभागीय अधिकारी वाशिम यांना माहिती दिली आहे. एक ते दोन दिवसात युसूबचा मृतदेह व काढून शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार गवळी यांनी दिली.