उत्तरिय तपासणीसाठी मुलीचा पुरलेला मृतदेह काढला
By Admin | Updated: September 19, 2014 01:33 IST2014-09-19T01:33:22+5:302014-09-19T01:33:22+5:30
शिरपूर येथील घटना : चुकीच्या उपचारामुळे मुलगी दगावल्याचा आरोप.

उत्तरिय तपासणीसाठी मुलीचा पुरलेला मृतदेह काढला
वाशिम : शिरपुर पोलिस स्टेशनअंतर्गत येणार्या केनवड येथील एका ९ वर्षीय मुलीचा मृतदेह अंत्यविधी झाल्यानंतर उत्तरिय तपासणीसाठी गुरूवारी काढण्यात आला. चुकीच्या उपचाराने ती दगावल्याचा आरोप वडिलांनी केल्यामुळे पोलिसांनी मुलीचा मृतदेह अकोला येथे तपासणीसाठी पाठविला.
शिरपुर पोलिस स्टेशनअंतर्गत येणार्या केनवड येथील गजानन शेषराव कांबळे यांची नऊ वर्षाची मुलगी प्रज्ञा ही तापाने आजारी होती. तिला केनवड येथील डॉ. गणेश घोटे यांच्याकडे उपचारासाठी भरती करण्यात आले होते; मात्र तिची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. त्यामुळे डॉ. घोटे यांनी प्रज्ञाला मेहकर येथील एका खासगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी पाठविले.
गजानन कांबळे यांनी प्रज्ञाला मेहकर येथील डॉक्टरकडे उपचारासाठी नेले; मात्र तेथील डॉक्टरने प्रज्ञाची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याने तिला वाशिम येथील खासगी डॉक्टरकडे हलविण्याचा सल्ला दिला. १३ सप्टेंबर रोजी तिला मेहकरहून वाशिमकडे उपचारासाठी नेले जात असताना, वाटेतच तिची प्राणज्योत मालवली. नातेवाईकांनी प्रज्ञाचा अंत्यविधी गावामध्येच केला. त्यानंतर प्रज्ञाच्या वडिलांनी डॉक्टरांनी चुकीचा उपचार केल्याचा आरोप करून, याप्रकरणी शिरपुर पोलिस स्टेशनमध्ये १८ सप्टेंबर रोजी तक्रार दिली; मात्र, प्रज्ञाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईपर्यंत कुणावरही गुन्हा दाखल करणे शक्य नाही. त्यामुळे उत्तरीय तपासणीसाठी तिचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी नातेवाईकांना विचारणा केली. नातेवाईकांनी संमती दर्शविल्यानंतर पोलिस निरिक्षक रमेश जायभाये, पोलिस उपनिरिक्षक कमलेश खंडारे, तहसिलदार कुंभारे यांच्यासह पोलिस कर्मचारी स्मशानभूमिमध्ये पोहचले. प्रज्ञाचा मृतदेह बाहेर काढून अकोला येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठविल्याची माहिती शिरपुर पोलिसांनी दिली. प्रज्ञाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट झाल्यानंतरच पुढील कारवाई करता येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. यासंदर्भात डॉ. घोटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा भ्रमणध्वनी कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आढळला.