अधिकारी, कर्मचा-यांची ‘दांडीयात्रा’
By Admin | Updated: February 5, 2015 01:17 IST2015-02-05T01:17:53+5:302015-02-05T01:17:53+5:30
वाशिम पंचायत समितीमधील प्रकार; दहा कर्मचारी गैरहजर.

अधिकारी, कर्मचा-यांची ‘दांडीयात्रा’
धनंजय कपाले /वाशिम:
येथील पंचायत समिती कार्यालयामधील बहुतांश कर्मचारी कोणाचीही परवानगी न घेता सामुदायीकरीत्या दांडी यात्रेवर असल्याचे सभापती वीरेंद्र देशमुख यांनी आज (दि. ४) सकाळी ९:४५ वाजताचे दरम्यान केलेल्या पंचनाम्यामधून उघडकीस आले.
विनापरवानगी गैरहजर असणार्या अधिकारी, कर्मचार्यांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे यांनी दिले.
पंचायत समितीचे सभापती विरेंद्र देशमुख यांनी १३ जानेवारी २0१४ रोजी पंचायत समितीमध्ये कर्तव्यावर असलेले काही कर्मचारी दांडी मारतात तर काही कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याची बाब उघडकीस आणली होती; मात्र त्यावेळी कर्मचार्यांना तोंडी तंबी देऊन माफ केले होते. त्यानंतर काही दिवस कर्मचारी वेळेवर हजर राहत होते. पुन्हा काही अधिकारी व कर्मचार्यांनी आपल्या सवईप्रमाणे उशिरा येणे, दांडी मारणे, दौरा दर्शवून वैयक्तिक कामे करणे असे प्रकार सुरू केले. अधिकारी व कर्मचार्यांच्या अशा वागणुकीमुळे पंचायत समितीमध्ये कामानिमित्त येणार्या नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे.
या अनुषंगाने सभापती देशमुख यांनी आज ४ फेब्रुवारी रोजी सकाळी 0९:४५ वाजता अचानक पंचायत समिती कार्यालय गाठले.
यावेळी केलेल्या झाडाझडतीमध्ये अनेक अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्षात गैरहजर असल्याचे आढळून आले. सकाळी १0 वाजता ३५ कर्मचार्यापैकी १0 कर्मचारी गैरहजर होते. लगेचच सभापती देशमुख यांनी उप मुख्यकार्यकारी अधिकारी योगेश जवादे यांना पंचायत समितीमधील प्रकार प्रत्यक्ष बघण्यासाठी भेट देण्याची विनंती केली.
अधिकारी जवादे यांनी तत्काळ पंचायत समितीला भेट दिली असता अनेक गंभीर बाबी त्यांना हजेरी रजिष्टर व हालचाल रजिस्टरवर आढळून आल्या. सभापती देशमुख व उपमुख्य कार्यकारी अधिकारी जवादे यांनी सकाळी ११:३0 वाजेपयर्ंत किती अधिकारी व कर्मचारी आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून कार्यालयामध्ये हजर होतात, याची वाट पाहिली. हळूहळू आपल्या सवईप्रमाणे अधिकारी व कर्मचारी कार्यालयामध्ये येऊ लागले. या सवार्ंची सभापती देशमुख व अधिकारी जवादे यांनी चांगलीच कानउघाडणी केली.