अतिवृष्टीमुळे ३२०० हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:38 IST2021-08-01T04:38:07+5:302021-08-01T04:38:07+5:30

संतोष वानखडे वाशिम : जिल्ह्यात २१ ते २३ जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे ३२०० हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले असून, ...

Damage to kharif crops on 3200 hectares due to heavy rains! | अतिवृष्टीमुळे ३२०० हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान !

अतिवृष्टीमुळे ३२०० हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान !

संतोष वानखडे

वाशिम : जिल्ह्यात २१ ते २३ जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे ३२०० हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले असून, २८८८ हेक्टरवरील नुकसानाचा सर्वे पूर्ण झाला. दुसरीकडे ४३३ हेक्टर जमीन खरडून गेली असून मंगळवारपर्यंत नुकसानभरपाई संदर्भात शासनाकडे अहवाल पाठविला जाण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

जिल्ह्यात मृग नक्षत्रात यापैकी बरसलेल्या पावसाने जूनच्या अखेरीस आणि जुलै महिन्याच्या सुरुवातीला दडी मारली होती. त्यामुळे पिके संकटात सापडली होती. दरम्यान, ११ जुलैपासून कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यात पाऊस बरसला. २१ ते २३ जुलै दरम्यान अतिवृष्टी झाल्याने खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. मानोरा व मंगरूळपीर तालुक्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नदीकाठावरील शेतातील पिकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. महसूल व कृषी विभागातर्फे युद्धपातळीवर पंचनामे सुरू असून, आतापर्यंत २८८८ हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले तर ३८८ हेक्टरवरील पिकांचे पंचनामे सोमवारपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अतिवृष्टीमुळे १० लहान व १० मोठी अशी एकूण २० जनावरे दगावली तर एका घराची पूर्णत: तर ४१ घरांची अंशत: पडझड झाल्याचे पंचनाम्यातून समोर आले. नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी याकरिता मंगळवारपर्यंत शासनाकडे अहवाल पाठविला जाण्याचा अंदाज आहे.

०००००००००००००

पीक नुकसानीची आकडेवारी

सर्वेक्षण पूर्ण - २८८८ हेक्टर

सर्वेक्षण बाकी - ३८८ हेक्टर

००००००

जमीन खरडून गेल्याचा लेखाजोखा

सर्वेक्षण पूर्ण - २९३ हेक्टर

सर्वेक्षण बाकी - १४० हेक्टर

००००००००००

घरांची पडझड

पूर्णत: पडझड - ०१

अंशत: पडझड- ४१

०००००००

भरपाईकडे नुकसानग्रस्तांचे लक्ष !

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले, जमीन खरडून गेली, जनावरे दगावली तसेच घरांची पडझड झाली. ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पीक नुकसान असल्यास भरपाई मिळते. शासन निकषानुसार किती भरपाई मिळणार, याकडे नुकसानग्रस्तांचे लक्ष लागून आहे.

०००००

जनावरे, घरांसाठी ७.२० लाखांची मागणी

अतिवृष्टीमुळे २० जनावरे मृत्युमुखी पडली असून, अंशत: ४१ तर पूर्णत: एका घराची पडझड झाली आहे. यासाठी ७.२० लाखांची गरज असून, तशी मागणी शासनाकडे नोंदविली जाणार आहे. शासन निकषानुसार नुकसानग्रस्तांना भरपाई दिली जाणार आहे.

००००००००

कोट बॉक्स

जिल्ह्यात २१ ते २३ जुलैदरम्यान अतिवृष्टी झाल्यामुळे नुकसानग्रस्त भागात पंचनामे केले जात आहेत. सोमवारपर्यंत पंचनामे पुर्ण होण्याची शक्यता असून, मंगळवारपर्यंत नुकसानभरपाई संदर्भातील अहवाल शासनाकडे पाठविला जाईल.

- शैलेश हिंगे

निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

Web Title: Damage to kharif crops on 3200 hectares due to heavy rains!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.