आरक्षणाची उत्सुकता शिगेला!
By Admin | Updated: June 10, 2016 02:14 IST2016-06-10T02:14:31+5:302016-06-10T02:14:31+5:30
वाशिम जिल्हा परिषद व पंचायत समिती; ३0 जूनला अडीच वर्षांंचा कार्यकाळ संपणार!

आरक्षणाची उत्सुकता शिगेला!
वाशिम: जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापतींचा अडीच वर्षांंचा कालावधी येत्या ३0 जून रोजी संपणार असून, आरक्षण काय निघणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, आरक्षण सोडत निघण्यापूर्वीच राजकीय घडामोडींनी वेग घेतल्याने निवडणूक चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहेत. डिसेंबर २0१३ मध्ये वाशिम जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. सदर निवडणूक शिवसेना-भाजप पक्षाच्या युतीने संयुक्तरीत्या लढविली, तर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्रपणे लढविली. ऐन निवडणुकीच्या काळातच गटबाजी उफाळून आल्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसून, २00८ च्या तुलनेत २0१३ मध्ये राकाँची सदस्य संख्या निम्यावर आली. राष्ट्रवादी काँग्रेस आठ, तर काँग्रेसने तब्बल १७ जागा जिंकून जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष म्हणून मान मिळविला. शिवसेनेला आठ, भाजपा व अपक्ष प्रत्येकी सहा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना चार व भारिप-बमसं तीन असे पक्षीय बलाबल राहिले. अध्यक्ष व सभापतींच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस युतीने अपक्षांच्या मदतीने सत्ता मिळविली. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींचा अडीच वर्षाचा कार्यकाळ येत्या ३0 जून रोजी संपत असल्याने आता अध्यक्ष पदाचे आरक्षण काय निघणार? याकडे सर्वांंचे लक्ष लागून आहे. दरम्यान, २0१४ मधील विधानसभा निवडणुकीने जिल्हा परिषद सदस्य संख्येतही उलथापालथ केली. जि.प. सदस्य विश्वनाथ सानप दाम्पत्य मनसेतून शिवसेनेत दाखल झाल्याने सेनेचे संख्याबळ १0 झाले, तर मालेगाव जिल्हा परिषद गट बाद झाल्याने मनसेचे संख्याबळ एकवर आले. २0१३ मध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद एससी महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने फारशी चुरस निर्माण झाली नसल्याचे बोलले जात आहे. अडीच वर्षांंच्या कालावधीनंतर अध्यक्षपदाचे आरक्षण काय निघणार? याकडे सर्वांचेच लक्ष असून, खुल्या प्रवर्गाची सोडत निघाली, तर बर्याच उलथापालथी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. १0, १२ किंवा १३ जून रोजी अध्यक्ष पदाची आरक्षण सोडत निघणार असल्याची चर्चा आहे.