कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी सेतू केंद्रांवर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:51 IST2017-09-15T01:51:27+5:302017-09-15T01:51:35+5:30
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी व २५ हजार रुपयेपर्यंत प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी शेतकर्यांनी १४ सप्टेंबर रोजी सेतू केंद्रांवर एकच गर्दी केली होती. दरम्यान, शासनाने कर्जमाफीचे अर्ज सादर करण्यासाठी सात दिवस मुदतवाढ दिली आहे; परंतु हा निर्णय उशिरा जाहीर झाल्याने १५ ऑगस्ट रोजीची पूर्वीची अंतिम मुदत लक्षात घेत शेतकर्यांची धावपळ सुरू होती.

कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी सेतू केंद्रांवर गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी व २५ हजार रुपयेपर्यंत प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी शेतकर्यांनी १४ सप्टेंबर रोजी सेतू केंद्रांवर एकच गर्दी केली होती. दरम्यान, शासनाने कर्जमाफीचे अर्ज सादर करण्यासाठी सात दिवस मुदतवाढ दिली आहे; परंतु हा निर्णय उशिरा जाहीर झाल्याने १५ ऑगस्ट रोजीची पूर्वीची अंतिम मुदत लक्षात घेत शेतकर्यांची धावपळ सुरू होती.
ऑनलाइन अर्ज भरताना संबंधित शेतकरी पती-पत्नी दोघेही, त्यांचे आधार कार्ड, मोबाइल क्रमांकासह उपस्थित असणे आवश्यक आहे. तसेच कर्जदार शेतकर्यांचे कर्ज खाते क्रमांक, बचत खाते क्रमांक आदी माहिती अर्जामध्ये भरणे बंधनकारक आहे. दरम्यान, ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी नाव नोंदणी केल्यानंतर अद्याप अनेक शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया विविध कारणांमुळे पूर्ण झालेली नाही. ऑनलाइन अर्ज भरल्याशिवाय कर्जमाफी अथवा २५ हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान मिळणार नाही. तसेच बँकेमध्ये ऑफलाइन अर्ज सादर केलेल्या शेतकर्यांनीसुद्धा ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा पूर्वी १५ सप्टेंबरपर्यंतच असल्याने त्यानंतर ऑनलाइन अर्ज करता येणार नाहीत, या भितीमुळे शेतकर्यांनी सेतू केंद्रांवर गुरुवार १४ ऑगस्ट रोजी मोठी गर्दी केली होती. आता ही मुदत ७ दिवस वाढविण्यात आली असून, ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर संबंधित केंद्रचालकाकडून अर्ज भरल्याची पावती मिळेल. यापूर्वी भरण्यात आलेल्या ऑनलाइन अर्जांमधील त्रुटींची दुरुस्ती करण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. या त्रुटींची दुरुस्तीही पुढील सात दिवस करण्यात येणार असल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.