भारनियमनामुळे पिके संकटात
By Admin | Updated: October 17, 2014 00:40 IST2014-10-17T00:40:57+5:302014-10-17T00:40:57+5:30
मंगरुळपीर तालुक्यातील भारनियमनाचा पिकांना फटका.

भारनियमनामुळे पिके संकटात
मंगरुळपीर (वाशिम): तालुक्यातील ग्रामीण भागातील जनता विजेचा सततचा लपंडाव आणि भारनियमनाने त्रस्त झाली आहे. वीजपुरवठा अनियमित असल्याने पिकांना पाणी देणे शक्य होत नाही. परिणामी पिके सुकत चालली आहेत. वीज वितरण कंपनीचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्यामुळे विविध ग्रामवासीयांकडून रोष व्यक्त केला जात आहे. कारंजा तालुक्यातील कामरगाव, धनज, पोहा, उंबर्डा आदी परिसरात अनेक दिवसांपासून महावितरणकडून वारेमाप भारनियमन करण्यात येत आहे. अगदी सण-उत्सवाच्या काळातही भारनियमन अणि विजेचा लपंडाव मोठय़ा प्रमाणात झाल्यामुळे या उत्सवावर विरजन पडल्यासारखे झाले होते. यंदा आधीच कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे खरिपातील पिकांचे उत्पादन घटणार आहे. त्याच बरोबर ज्यांच्याकडे ओलिताची व्यवस्था आहे, असे शेतकरीही अनियमित वीजपुरवठा आणि अवेळी करण्यात येत असलेल्या भारनियमनामुळे पिकांना पाणी देऊ शकत नाहीत. त्यामुळे पिकांची स्थिती वाईट झाली आहे.