२०७ कोटींचे पीक कर्ज वाटप; रक्कम खात्यात पडून!

By Admin | Updated: May 2, 2017 01:04 IST2017-05-02T01:04:16+5:302017-05-02T01:04:16+5:30

रोकड टंचाईमुळे शेतकरी हवालदिल : ऐन खरिपाच्या तोंडावर उद्भवला बिकट प्रश्न; पीक कर्जाचे उद्दिष्ट गाठणेही कठीण

Crop loan allocation of 207 crores; Amount lying in the account! | २०७ कोटींचे पीक कर्ज वाटप; रक्कम खात्यात पडून!

२०७ कोटींचे पीक कर्ज वाटप; रक्कम खात्यात पडून!

वाशिम : नाफेड केंद्रावरील तूर मोजणीच्या चक्रव्यूहातून बाहेर पडत नाही; तोच शेतकऱ्यांना पीककर्ज रकमेच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. रोकड तुटवड्यामुळे पीक कर्जाची रक्कम बँक खात्यातून काढणे शक्य होत नसून ‘एटीएम’ही सदोदित बंद राहत असल्याने शेतकऱ्यांचे खरिप हंगामाचे नियोजन कोलमडत आहे. गत आठवड्यात रोकड प्राप्त होईल, अशी ग्वाही देणाऱ्या प्रशासनाला आरबीआयकडून रोकड प्राप्त करण्यात अद्याप यश मिळालेले नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांना यंदा ११५० कोटी रुपये कर्जवाटपाचे उद्दीष्ट असून १ मे २०१७ पर्यंत त्यापैकी २०७ कोटी ८० लाख रुपये पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या हाती ही रक्कम पडलेली नाही. साधारणत: दीड महिन्यांपासून जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये रोकड टंचाईचे संकट उभे ठाकले असून रोखीचे व्यवहार बहुतांशी मंदावले आहेत. रोकडटंचाईचा सर्वाधिक फटका सद्या शेतकऱ्यांना बसत आहे. पीककर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात असून एटीएममधूनच ती रक्कम काढण्याचे बंधन जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून टाकले जात आहे. असे असले तरी काहीठिकाणी सुरू असलेल्या एटीएममधून पाच हजारापेक्षा अधिक रकमेचा ‘विड्रॉल’ होत नसल्याने पीककर्जाची रक्कम बँक खात्यातच पडून राहत असल्याचे विदारक वास्तव समोर येत आहे. तथापि, बँक खात्यात पैसे असूनही, केवळ रोकड टंचाईमुळे खरिप हंगामातील पिकांच्या पेरणीकरिता आवश्यक साहित्यांची खरेदी करण्यात व्यत्यय निर्माण होत आहे. यामुळे रोकड टंचाईच्या संकटाने जिल्ह्यातील शेतकरी पुरते हैराण झाले आहेत. या समस्येवर तत्काळ प्रभावी तोडगा काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

शेतकऱ्यांना साडेपाच कोटींची व्याज सवलत!

वेळेच्या आत पीककर्जाच्या रकमेचा भरणा करणाऱ्या जिल्ह्यातील ३५ हजार ६१४ शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत ५ कोटी ४४ लाख रुपयांची व्याज सवलत देण्यात आली.
खरिप हंगामात शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ दिला जातो. १ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर कोणतेही व्याज आकारले जात नाही. मात्र, या कर्जाची परतफेड ३१ मार्चपूर्वी करणे बंधनकारक आहे. एक लाख रुपयांच्या वर पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना बँकेतर्फे व्याज आकारले जाते. विहित मुदतीत पीककर्जाच्या रकमेची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत व्याज सवलत दिली जाते. या योजनेंतर्गत गतवर्षी पीककर्ज काढलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी व्याज सवलत योजनेचा लाभ देण्यात आला. जिल्ह्यातील ३५ हजार ६१४ शेतकऱ्यांनी विहित मुदतीच्या आत पीककर्जाची परतफेड केल्याने या शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेचा लाभ देण्यात आला. व्याज सवलतीची ही रक्कम ५ कोटी ४४ लाख रुपयांच्या घरात जाते.

रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांशी रोकडटंचाईसंदर्भात वारंवार संपर्क साधला जात आहे. पीककर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना जाणवणाऱ्या अडचणींबाबतही वरिष्ठांना अवगत करण्यात आले आहे. मात्र, संपूर्ण देशातच रोकड टंचाईने तोंड वर काढल्याने कुठलाच पर्याय चालत नसून ही समस्या आणखी काही दिवस अशीच कायम राहण्याचे संकेत आहेत. शेतकऱ्यांनी याकामी प्रशासनाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे.
-व्ही.एच. नगराळे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, वाशिम

पीककर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना रोखीने पैसे अदा करण्यापुरती रोकड बँकेकडे उपलब्ध नाही. त्यामुळे ठराविक रकमेचा ‘विड्रॉल’ तो ही एटीएमव्दारे दिला जावा, असे वरिष्ठांचे निर्देश असून त्याचे पालन केले जात आहे. याशिवाय शेतकऱ्यांची होणारी गैरसोय टाळण्याकरिता पीककर्ज खात्यातील रक्कम त्यांच्या बचत खात्यात वळती केली जात आहे.
- टी.के.देशमुख, शाखा व्यवस्थापक, जिल्हा मध्यवर्ती बँक, रिसोड

 

Web Title: Crop loan allocation of 207 crores; Amount lying in the account!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.