१९ मार्चला रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान शिरपूर, मिर्झापूर, घाटा व परिसरात साधारण बोराच्या आकाराची गारपीट झाली. सोबतच वादळी वाऱ्यासह पाऊसही पडला. वादळीवारे व गारपिटीने शेतकऱ्यांचे अतिमहत्त्वाचे मोठे कष्ट व खर्च करून वाढविले बिजवाई कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. गहू, ज्वारी, मूग, भाजीपालावर्गीय पिकांसह, आंबा, लिंबू, केळी, कलिंगड, खरबूज या फळांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले. परिसरात हळद काढणी सुरू असल्याने हळद काढणी सुरू असलेल्या शेतकऱ्यांची त्रेधा उडाली. नंदकिशोर गोरे, गणेश ईरतकर, जयंता ईरतकर या शेतकऱ्यांचे शेडनेटचे वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले. नंदकिशोर गोरे या शेतकऱ्याचे अकरा लाखांचे शेडनेट पूर्णता उद्ध्वस्त झाले. सचिन निकम या शेतकऱ्याचे चार एकरातील खरबूज व सांभाराचे नुकसान झाले. संजय देशमुख यांचे तीन एकरांतील बिजवाई कांदा पिकाचे नुकसान झाले. कैलासराव देशमुख यांच्या शेतातील केळीचे मोठे नुकसान झाले. वामनराव जाधव, किशोर जाधव यांच्या मिर्झापूर शिवारातील साडेसहा एकरातील मुगाच्या पिकाचे नुकसान झाले. एकंदरीत शिरपूर व परिसरातील शेकडो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे वीज सबस्टेशन परिसरात, पोलीस स्टेशन परिसरात झाडे उन्मळून पडली. नवीन झोपडपट्टी परिसरात बाभळीचे झाड एका घरात समोर कोसळले. पोलीस कर्मचारी संजय घुले यांच्या घराचा संरक्षण भिंतीवर झाड कोसळले. वादळी वाऱ्यामुळे काही लघू व्यावसायिकांचा दुकानावरील व घरावरील टिनपत्रेही उडाले. शिरपूर येथे १९ मार्च रोजी २० मिमी. पाऊस पडल्याचे पर्जन्यमापक गजानन वाढे यांनी सांगितले. दरम्यान, आमदार अमित झनक व जिल्हा परिषद अध्यक्ष श्याम गाभणे यांनी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी दिल्या, नुकसानीची पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी महसूल प्रशासनाला सूचना दिल्या.
.................
वीजपुरवठा गुल
१९ मार्च चार रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट सुरू असताना, शिरपूर येथील वीजपुरवठा खंडित झाला. खंडित वीजपुरवठा २० मार्च सकाळी दहा वाजेपर्यंतही सुरू झाला नव्हता. त्यातच सर्वच मोबाइलची सेवाही बंद पडली होती.