शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By Admin | Updated: March 3, 2016 02:25 IST2016-03-03T02:25:25+5:302016-03-03T02:25:25+5:30
अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका; पंचनाम्यात दिरंगाई.

शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान
वाशिम: वादळवारा व विजांच्या कडकडाटात जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळनंतर जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेकडो हेक्टरवरील भाजीपाला, फळबाग व रब्बी पिकांचे नुकसान झाले. दरम्यान, शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने जिल्हय़ातील १0९२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाने वर्तविला आहे.
२७ फेब्रुवारी रोजी सकाळपासून जिल्हय़ात ढगाळ वातावरण होते, तसेच वातावरणात दमटपणाही वाढला होता. दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील वाशिम, मानोरा, मंगरूळपीर, कारंजा, मालेगाव, रिसोड या सहाही तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. जिल्हय़ातील मालेगाव, रिसोड, मानोरा व कारंजा तालुक्यामध्ये २७, २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या वादळी वार्यासह पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल संबंधित तहसीलदारांनी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. या अहवालानुसार रिसोड तालुक्यातील १८६ हेक्टर, मालेगाव ७0, कारंजा ७६0 व मानोरा तालुक्यातील ७७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. १ मार्च रोजी सायंकाळनंतर रिसोड, मंगरुळपीर, वाशिम, कारंजा तालुका व अन्यत्र वादळवार्यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे भाजीपाला, फळबाग व रब्बी हंगामातील गहू, हरभर्याचे नुकसान झाले. कृषी व महसूल विभागाने तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामे व सर्वेक्षण करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. काही ठिकाणी दिरंगाई होत असल्याने पीक नुकसानापासून शेतकर्यांना वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. मानोरा तालुक्यातील २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या पाऊस, वादळीवार्यासह गारपिटीमुळे ७ गावातील ७७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याबाबत तहसीलदार मानोरा यांनी प्राथमिक अहवालानुसार कळविले आहे. गत तीन वर्षांपासून वाशिम जिल्ह्यातील शेतकर्यांवर नैसर्गिक संकट कोसळत आहे. पावसाळ्यात फितूर होणे आणि जानेवारी ते मार्च दरम्यान येणार्या अवकाळी पावसाने शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.