जिल्हाधिका-यांनी जाणून घेतल्या डाळिंब उत्पादकांच्या व्यथा!
By Admin | Updated: December 24, 2015 02:43 IST2015-12-24T02:43:06+5:302015-12-24T02:43:06+5:30
फळबागांसाठी पाणी मिळण्याची शेतक-यांची मागणी.

जिल्हाधिका-यांनी जाणून घेतल्या डाळिंब उत्पादकांच्या व्यथा!
मंगरुळपीर (जि. वाशिम): जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी मंगरुळपीर येथील शेतकरी प्रतापराव बाबरे यांच्या वाढा शिवारातील डाळिंब बागेला २२ डिसेंबर रोजी भेट देऊन पाहणी केली असता, उपस्थित शेतकर्यांनी त्यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. मंगरुळपीर येथील शेतकरी बाबरे यांच्या वाढा शिवारातील १२ एकर डाळिंब बागेला जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या भेटीदरम्यान पॅकिंग हाऊसचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शेतकर्यांच्या समस्या जाणून घेत त्या विनाविलंब निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मुरलीधर इंगळे यांना दिल्या. डाळिंबाची उत्कृष्ट दर्जाची फळे असतानाही त्यास केवळ ४६ रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्याने शेतकर्यांनी खंत व्यक्त केली. तसेच जलयुक्त शिवार योजनेचा लाभ प्रत्येक गावातील शेतकर्यांना मिळाला तर बारमाही फळबागेचे उत्पादन घेता येईल. यासह महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची २ हेक्टर र्मयादेची अट शिथिल झाली तर सीताफळ या पिकास जिल्ह्यामध्ये लागवड होण्यास भरपूर वाव मिळेल, ही बाब उपस्थित शेतकर्यांनी यावेळी जिल्हाधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिली. सोबतच कोणत्याही फळ पिकास प्लास्टिक मल्चिंग असल्यास त्याव्दारे पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकतो. यासाठी मात्र शासनाने पुरेसे अनुदान द्यायला हवे. शेजारी जिल्ह्यांमध्ये मल्चिंग योजनेला अनुदान मिळते; मात्र वाशिम जिल्ह्यातील शेतकर्यांना या योजनेचा लाभ मिळाला नसल्याची खंत शेतकर्यांनी बोलून दाखविली. यावेळी प्रतापराव बाबरे, सतीश बाबरे, प्रमोद बाबरे, विनोद बाबरे, बाळु पाटील गावंडे, देवलाल ठाकरे, प्रवीण ठाकरे, मंगळसा ग्रामपंचायत सरपंच चंद्रकांत पाकधने, शंकरराव सावके, यशवंत धोटे, तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.