२५ फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी
By Admin | Updated: October 18, 2014 01:46 IST2014-10-18T01:46:47+5:302014-10-18T01:46:47+5:30
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीला रविवारी सकाळी ८ वाजतापासून प्रारंभ होणार आहे.

२५ फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी
वर्धा : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीला रविवारी सकाळी ८ वाजतापासून प्रारंभ होणार आहे. वर्धा व देवळी विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी वर्धेतील भारतीय खाद्य निगम (एफसीआय) गोदाम क्रमांक २१ मध्ये सकाळी ८ वाजतापासून होईल. मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. तसेच या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
देवळी विधानसभा मतदारसंघात १४ टेबलवर मतमोजणी होणार असून, संपूर्ण मतमोजणी २४ फेऱ्यामध्ये होईल. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर तीन कर्मचारी राहणार आहेत. प्रारंभी पोस्टल बॅलेटची मोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएम मशीनवरील मतमोजणीला प्रारंभ होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शिरीष पांडे यांनी दिली.
वर्धा विधानसभा मतदार संघातील मतमोजणी एफसीआय गोदामातच होत असून मतमोजणीसाठी १४ टेबल राहणार आहेत. २५ फेऱ्यांमध्ये मतमोजणी करण्यात येणार असून, मतमोजणीचे निकाल तीन ते चार वाजेपर्यंत लागतील अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.
हिंगणघाट विधानसभा निवडणूक मतमोजणी नवीन तहसील कार्यालयाच्या इमारतीत होत असून १४ टेबलवर २४ फेऱ्यांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. उमेदवार तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी गोकुलधाम येथे वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी घनश्याम भुगावकर यांनी दिली.
आर्वी येथील मतमोजणी गांधी विद्यालय येथे होत असून १४ टेबलवर २६ फेऱ्यामध्ये मतमोजणीची प्रक्रिया पुर्ण होईल. परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशेष पासेस देण्यात आल्या आहेत. याच परिसरात माध्यमी प्रतिनिधीसाठीही व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विलास ठाकरे यांनी दिली. तयारीची पाहणी जिल्हाधिकारी सोना व निवडणूक अधिकाऱ्यांच्यावतीने करण्यात आली.(प्रतिनिधी)