समुपदेशनातून शिक्षकांचे समायोजन व पदोन्नती !
By Admin | Updated: April 12, 2017 13:33 IST2017-04-12T13:33:43+5:302017-04-12T13:33:43+5:30
पदवीधर शिक्षकांचा समायोजन व पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला असून, ११ एप्रिलपासून ही प्रक्रिया समुपदेशन पद्धतीने राबविली जात आहे.

समुपदेशनातून शिक्षकांचे समायोजन व पदोन्नती !
वाशिम : गत काही महिन्यांपासून रखडलेला प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षकांचा समायोजन व पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला असून, ११ एप्रिलपासून ही प्रक्रिया समुपदेशन पद्धतीने राबविली जात आहे. पहिल्या दिवशी २२ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व २५० च्या वर पदवीप्राप्त शिक्षकांचे पदवीधर शिक्षक म्हणून पदोन्नतीने समायोजन करण्यात आले.
दुसऱ्या दिवशी अर्थात १२ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात सकाळी ११ वाजतापासून पदोन्नतीची प्रक्रिया सुरू झाली. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांवर पदवीधर शिक्षक म्हणून एकूण ५९९ पदे मंजूर आहेत. यापैकी १९४ शिक्षक कार्यरत आहेत. ४०५ पदे रिक्त असून, या रिक्त पदांवर पदवीपात्र शिक्षकांना पदवीधर शिक्षक म्हणून पदोन्नती दिली जात आहे. ११ एप्रिल रोजी रात्री ९ वाजजापर्यंत समायोजन व पदोन्नतीची प्रक्रिया सुरू होती. खूप उशिर होत असल्याने ही प्रक्रिया १२ एप्रिल रोजी पूर्ववत केली जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार १२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजतापासून समुपदेशन पद्धतीने समायोजन प्रक्रियेला सुरूवात झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, शिक्षण व आरोग्य सभापती सुधीर पाटील गोळे, शिक्षणाधिकारी दिनकर जुमनाके, उपशिक्षणाधिकारी अंबादास मानकर, सहायक प्रशासन अधिकारी गजानन खुळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांची बहुसंख्येने उपस्थिती आहे.