रानडुकरांनी उद्ध्वस्त केले कपाशीचे पीक; निराधार महिलेचे हुकले आर्थिक गणित - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:48 IST2021-09-24T04:48:54+5:302021-09-24T04:48:54+5:30

मानोरा : तालुक्यातील कारखेडा येथे अत्यल्पभूधारक निराधार शेतकरी महिलेने दोन एकर शेतात पेरलेले आणि अनुकूल वातावरणामुळे बहरलेले कपाशीचे पीक ...

Cotton crop destroyed by cattle; Homeless woman's hooked financial math - A | रानडुकरांनी उद्ध्वस्त केले कपाशीचे पीक; निराधार महिलेचे हुकले आर्थिक गणित - A

रानडुकरांनी उद्ध्वस्त केले कपाशीचे पीक; निराधार महिलेचे हुकले आर्थिक गणित - A

मानोरा : तालुक्यातील कारखेडा येथे अत्यल्पभूधारक निराधार शेतकरी महिलेने दोन एकर शेतात पेरलेले आणि अनुकूल वातावरणामुळे बहरलेले कपाशीचे पीक रानडुकरांनी उद्ध्वस्त केले. यामुळे विधवा महिला शेतकऱ्याचे आर्थिक गणित पूर्णत: हुकले असून, पुढील १२ महिन्यांचे नियोजन करायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे.

कारखेडा येथील विधवा महिला शेतकरी विमल बिबिचंद राठोड (५५) यांच्याकडे दोन एकर शेती आहे. या शेतीच्या भरवशावरच त्या संपूर्ण कुटुंबाचे पालनपोषण करतात. १६ सप्टेंबरच्या रात्री रानडुकरांचा मोठा कळप विमल यांच्या शेतात शिरला. पाहता पाहता रानडुकरांनी कपाशीचे संपूर्ण बोंडे फस्त करून उभी असलेली झाडे जमीनदोस्त केली. दुसऱ्या दिवशी शेतात जाऊन अत्यंत मेहनतीने संगोपन केलेले कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाल्याचे पाहून विमल राठोड यांना अश्रू अनावर झाले. जंगली प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून तत्काळ नुकसानभरपाई द्यावी व जंगली प्राण्यांचा वनविभागाने वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी विमल राठोड यांनी केली आहे.

..........................

बाॅक्स :

रानडुकरांचा त्रास बळावला

कारखेडा परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून रानडुकरांचा त्रास तुलनेने अधिक बळावला आहे. रानडुकरांचे कळप थेट शेतात शिरून उभ्या पिकांची नासाडी करत आहेत. याबाबत यापूर्वी अनेकवेळा शेतकऱ्यांनी वनविभागाला अवगत केले, मात्र त्याचा काहीच फायदा झालेला नाही. वनविभागाच्या भूमिकेप्रति यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

...........

कोट :

पतीच्या निधनानंतर मीच कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. जवळ असलेल्या दोन एकर शेतातून निघणाऱ्या उत्पन्नाच्या आधारे चरितार्थ चालविला जातो. असे असताना रानडुकरांनी कपाशीचे संपूर्ण पीक उद्ध्वस्त करून टाकले. झाडेही मोडून टाकल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. प्रशासनाने तत्काळ नुकसानीचा सर्व्हे करून भरपाई द्यावी, अशी अपेक्षा आहे.

- विमल राठोड, शेतकरी, कारखेडा

Web Title: Cotton crop destroyed by cattle; Homeless woman's hooked financial math - A