Corona Vaccine : दोन्ही लसी परिणामकारकच; पण कोविशिल्डला अधिक पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 11:35 AM2021-06-21T11:35:59+5:302021-06-21T11:36:08+5:30

Corona Vaccine: आतापर्यंत १ लाख ७७ हजार १०४ जणांनी कोविशिल्ड, तर १ लाख ३ हजार ५३१ जणांनी कोव्हॅक्सिन लस घेतली आहे.

Corona Vaccine: Both vaccines are effective; But Covishield prefers | Corona Vaccine : दोन्ही लसी परिणामकारकच; पण कोविशिल्डला अधिक पसंती

Corona Vaccine : दोन्ही लसी परिणामकारकच; पण कोविशिल्डला अधिक पसंती

googlenewsNext

- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणावर भर दिला जात आहे. दोन्ही लसी परिणामकारकच आहेत. परंतु परदेशात जाण्यास परवानगी असलेली कोविशिल्ड लस घेण्याला अनेकांची पसंती असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. आतापर्यंत १ लाख ७७ हजार १०४ जणांनी कोविशिल्ड, तर १ लाख ३ हजार ५३१ जणांनी कोव्हॅक्सिन लस घेतली आहे.
देशात मार्च २०२०पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. पहिल्या लाटेत जिल्ह्यात जुलै व सप्टेंबर या दोन महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली होती. एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत एकूण कोरोनाबाधित रुग्ण ७१४३ होते, तर एकूण १५४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते मे २०२१ या कालावधीत जिल्ह्यात ३२ हजारांवर रुग्ण आढळून आले. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे लसीकरणावरही भर देण्यात आला. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्स, १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील आणि १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याला सुरुवात झाली. आता दुसरी लाट ओसरत असताना, संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणावर सर्वाधिक भर दिला जात आहे. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी परिणामकारक व सुरक्षित असून, उपलब्ध लसीनुसार पात्र नागरिकांना लस देण्यात येत आहे. तथापि, कोविशिल्ड लस घेण्याला अनेकांची पसंती मिळत असल्याचे दिसून येते. परदेशात जाण्यास परवानगी, लस घेतल्यानंतर फारसा त्रास न जाणवणे आदी कारणे समोर करून अनेकजण कोविशिल्ड लस घेत असल्याचे दिसून येते. कोविशिल्डसाठी वेळप्रसंगी वेटिंगवरही राहण्याची अनेकांची तयारी आहे.


एकाच लसीचा आग्रह धरू नये !
कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी प्रभावी व परिणामकारक आहेत. दोन्ही लसी पुर्णत: सुरक्षित असून, पात्र नागरिकांनी कोणत्याही एका विशिष्ट लसीचा आग्रह धरू नये. उपलब्धतेनुसार लस घ्यावी. कोणत्याही अफवा, गैरसमजावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.

कोविशिल्डसाठी सांगितली जाणारी कारणे !

  • परदेशात जाण्यासाठी कोविशिल्ड लस घेतल्याचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते.
  • लस घेतल्यानंतर फारसा त्रास होत नाही.
  • अधिक प्रमाणात परिणामकारक आहे.
  • शहर, ग्रामीण भागातील केंद्रात सहज उपलब्ध होते.


कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी परिणामकारक व प्रभावी आहेत. लसीबाबत कोणताही भेदभाव न करता उपलब्धतेनुसार पात्र नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी.
- डॉ. अविनाश आहेर,
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम.

Web Title: Corona Vaccine: Both vaccines are effective; But Covishield prefers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.