जिल्ह्यातील एकमेव लॅबमध्ये ९४ हजार जणांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:39 IST2021-02-13T04:39:46+5:302021-02-13T04:39:46+5:30
देशात कोरोना संसर्गाचा शिरकाव झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. यासाठी शासनाने लॉकडाऊन आणि जिल्हा सीमाबंदीसह विविध उपाय योजना लागू ...

जिल्ह्यातील एकमेव लॅबमध्ये ९४ हजार जणांची कोरोना चाचणी
देशात कोरोना संसर्गाचा शिरकाव झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. यासाठी शासनाने लॉकडाऊन आणि जिल्हा सीमाबंदीसह विविध उपाय योजना लागू केल्या. आरोग्य विभागाकडूनही कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी जनतेत जनजागृती सुरू करण्यात आली. वाशिम जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गाचा पहिला रुग्ण आढळून आला. सुरुवातीला वाशिम जिल्ह्यात कोरोना चाचणीची सुविधाच नसल्याने संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी अकोला, अमरावती आणि यवतमाळ येथील प्रयोगशाळेत पाठविले जात होते. त्यामुळे रुग्णाचा चाचणी अहवाल प्राप्त होण्यास विलंब लागत होता. परिणामी, कोरोनाबाधितांच्या संपर्कातील रुग्णांची चाचणी करणेही अशक्य होते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून जिल्ह्यातच कोरोना चाचणीसाठी आरटीपीसीआर प्रयोगशाळा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. आरोग्यमंत्र्यांनी या मागणीची दखल घेऊन जिल्हास्तरावर प्रयोगशाळा सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली. यासाठी लागणाऱ्या तज्ज्ञ मंडळीची पदस्थापना आणि इतर सुविधा उपलब्ध करण्यास निधीही उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे वाशिम येथे जिल्हास्तरावर स्त्री रुग्णालयात कोरोना चाचणीसाठी आरटीपीसीआर प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. या प्रयोगशाळेत १२ फेब्रुवारीपर्यंत एकूण ९४ हजार लोकांची कोरोना चाचणी करणे आरोग्य विभागाला शक्य झाले. यामुळे वेळेत चाचणी होऊन कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविणेही शक्य झाले आहे.
---------
सर्वच रिपोर्ट अचूक
जिल्ह्यात आरटीपीसीआर प्रयोगशाळा सुरू झाल्यानंतर दरदिवशी सरासरी २०० जणांची कोरोना चाचणी केली जात आहे. यात प्रामुख्याने बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींसह इतर संशयितांचा समावेश आहे.
या प्रयोगशाळेत आरोग्य विभागाने आजवर ९४ हजार लोकांची कोरोना चाचणी यशस्वी केली. त्यात एकाही चाचणीत दोष आढळून आला नाही किंवा चुकीची असल्याचा प्रकार घडला नाही.
--------------
लॅबचा कायम वापर
राज्यासह वाशिम जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असून, पुढे वाशिम जिल्हा कोरोनामुक्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि, कोरोना चाचणीसाठी सुरू केलेली प्रयोगशाळा पुढे कोणत्याही प्राण्यांपासून किंवा डासांपासून होणाऱ्या आजारांसह विविध आजारांच्या निदानासाठी उपयोगात आणली जाणार आहे.
-------------
सर्वसाधारण योजनेसह नियोजनकडून निधी
जिल्ह्यात कोरोना चाचणीसाठी प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्यानंतर येथे होणाऱ्या चाचण्यांसाठी लागणारा खर्च भागविण्याकरिता निधीची गरज होती. ही गरज नियोजन विभागासह जिल्हा सर्वसाधारण योजनेतून पूर्ण करण्यात येत आहे. यासाठी आजवर जवळपास ३ कोटी रुपयांहून अधिक खर्च आला असून, यापूर्वी मंजूर झालेल्या निधीपैकी बराच निधी शिल्लक असल्याने कोरोना चाचणीत सद्यस्थितीत कोणताही अडथळा नसल्याचे स्पष्ट होत आहे.