जिल्हा सीमेवरही होणार कोरोना चाचणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:39 IST2021-04-25T04:39:51+5:302021-04-25T04:39:51+5:30
वाशिम : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाबंदी असून, अत्यावश्यक कारणांसाठी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांची जिल्हा सीमेवरच कोरोना चाचणी करण्याचे निर्देश ...

जिल्हा सीमेवरही होणार कोरोना चाचणी!
वाशिम : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाबंदी असून, अत्यावश्यक कारणांसाठी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांची जिल्हा सीमेवरच कोरोना चाचणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी संबंधित यंत्रणेला शुक्रवारी दिले.
राज्यातील वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीसह इतर निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. जिल्हाबंदी आदेशाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, अत्यावश्यक कारणांमुळे इ-पास असणाऱ्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे. जिल्हा शेजारी असणाऱ्या प्रत्येकच जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे परजिल्ह्यातील प्रवाशांना जिल्ह्यात प्रवेश देताना सीमेवरच कोरोना चाचणी केली, तर संभाव्य कोरोना संसर्गाचा धोका बऱ्याच प्रमाणात टाळला जाऊ शकतो. या अनुषंगाने जिल्हा सीमेवरच कोरोना चाचणी करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी सर्व संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. जिल्हा सीमेवर ३३ नाकाबंदी तसेच ५८ तपासणी नाके उभारून वाहनांची तपासणी केली जात आहे. परजिल्ह्यातील प्रवासी कोरोनाचे वाहक ठरू नयेत म्हणून संदिग्ध रुग्णांची रॅपिड अॅन्टिजेन चाचणी केली जाणार आहे. या चाचणीत पॉझिटिव्ह येणाऱ्यांना कोविड केअर सेंटर किंवा १४ दिवसांसाठी गृहविलगीकरणात ठेवले जाणार आहे.
०००
कोट
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील गर्दीच्या ठिकाणी तसेच जिल्हा सीमेवरदेखील कोरोना चाचणी करण्यात यावी, अशा सूचना संबंधित यंत्रणेला दिलेल्या आहेत.
- शण्मुगराजन एस.,
जिल्हाधिकारी, वाशिम.