कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम गतिमान करावी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:26 IST2021-07-21T04:26:55+5:302021-07-21T04:26:55+5:30
वाशिम : कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र व्यक्तींचे ...

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम गतिमान करावी !
वाशिम : कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र व्यक्तींचे लसीकरण अधिक गतीने करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिल्या. १९ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात त्यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्ग सद्यस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, खासदार भावना गवळी, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार किरणराव सरनाईक, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्यासह विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. पालकमंत्री देसाई म्हणाले, लसीकरणाचे प्रमाण कमी असलेल्या भागांवर लक्ष केंद्रित करून जनजागृती करावी. काही नागरिकांमध्ये लसीकरणाविषयी गैरसमज असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या मनातील गैरसमज दूर करून त्यांना लसीकरणाचे महत्व पटवून द्यावे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोयीसाठी तात्पुरत्या स्वरुपात लसीकरण केंद्र उभारून लसीकरण मोहीम राबवावी, यासाठी आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. खासदार गवळी म्हणाल्या, काही संस्था आरोग्य विभागासाठी उपकरणे व आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यास तयार आहेत. त्यासाठी आरोग्य विभागाने मागणी करावी. आमदार पाटणी म्हणाले, कारंजा उपजिल्हा रुग्णालयातील व्हेंटिलेटर सुविधा तातडीने सुरू करावी.
०००००००००००
रुग्णालयांमधील सुविधांवर भर द्यावा !
आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिल्याने जिल्हा कोविड रुग्णालयासह कारंजा उपजिल्हा रुग्णालय व सर्व ग्रामीण रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधा तयार कराव्यात. जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांटची उभारणी, साठवण क्षमता वाढविण्याची कार्यवाही सुरू असून, ही कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करावा. मनुष्यबळाची कमतरता भासू नये, यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, सूचना पालकमंत्री देसाई यांनी दिल्या.
०००००००००००००
सरासरी २९ टक्के लसीकरण !
जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण सध्या नियंत्रणात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २९ टक्के लसीकरण झाले असून, अधिकाधिक पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे, असे जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी सांगितले. कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडची पुरेशा प्रमाणात वाढ करण्यात आली आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.