कोरोनाने हिरावले पाच मुलांचे आई-बाबा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:40 IST2021-05-26T04:40:55+5:302021-05-26T04:40:55+5:30

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गामुळे आई-वडिलांचा मृत्यू झालेल्या बालकांची काळजी घेण्यासाठी जिल्हास्तरावर कृती दल (टास्क फोर्स) गठित करण्यात आले ...

Corona deprives parents of five children! | कोरोनाने हिरावले पाच मुलांचे आई-बाबा !

कोरोनाने हिरावले पाच मुलांचे आई-बाबा !

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गामुळे आई-वडिलांचा मृत्यू झालेल्या बालकांची काळजी घेण्यासाठी जिल्हास्तरावर कृती दल (टास्क फोर्स) गठित करण्यात आले आहे. कोरोनाने पाच मुलांचे आई-बाबा हिरावले असून, १५ मुलांच्या आई-बाबांपैकी एका जणाचा मृत्यू झाला आहे. आई-बाबांचे छत्र हरविलेल्या या मुलांसाठी शासनाने मदतीचा हात पुढे केला आहे.

कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची जबाबदारी शासनाने जिल्हास्तरीय कृती दलावर सोपविण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या कृती दलात पोलीस अधीक्षक, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव, जिल्हा बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांचा समावेश असून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी या कृती दलाचे सदस्य सचिव आहेत. कोरोना संसर्गामुुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या व घरात कुणाचेही छत्र नसलेल्या मुलींची व्यवस्था वाशिम येथील बालगृहात व मुलांची व्यवस्था मानोरा येथील बालगृहात केली जाणार आहे. याशिवाय शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून दरमहा मदतही केली जाणार आहे. कोरोनामुळे पालकत्व हिरावून घेतलेल्या बालकांचा शोध घेण्यात येत आहे. यासाठी ‘चाइल्ड लाइन’च्या १०९८ या टोल फ्री क्रमांकाची सुविधाही उपलब्ध केली आहे. सर्वसामान्य नागरिकांनीही अशा बालकांची माहिती १०९८ या टोल फ्री क्रमांकावर कळवून प्रशासनाला सहकार्य करता येणार आहे.

०००००००००

कोरोनामुळे आई-बाबा हिरावलेल्यांची संख्या ५

मुले -४

मुली - १

०००००००

बॉक्स

आई किंवा वडिलांचा मृत्यू झाला असल्यास दरमहा मदत !

दोन्ही पालक किंवा आई-वडिलांपैकी एकाचा मृत्यू झाला असल्यास शासनाच्या बालसंगोपन योजनेंतर्गत ११०० रुपये दरमहा अर्थसाहाय्य केले जाणार आहे.

गरजेनुसार मदत केली जाणार आहे. मुलाचा सांभाळ करण्यास कुणी तयार नसेल तर बालगृहात ठेवले जाणार आहे.

जिल्ह्यात पाच मुलांच्या आई-वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तसेच १५ मुलांच्या आई-बाबांपैकी एका जणाचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली आहे.

०००००००

बॉक्स

या अनाथ मुलांच्या राहण्याची, शिक्षण, आरोग्याची सोय होणार !

कोरोनाने ज्या मुलांचे आई-बाबा हिरावले आहेत आणि नात्यातील इतर कुणी सांभाळ करण्यास तयार नसेल तर अशा मुलांना वयाच्या १८ वर्षांपर्यंत बालगृहात ठेवण्यात येणार आहे.

या मुलांच्या आरोग्याची काळजी म्हणून नियमित आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यावर महिला व बालविकास अधिकाऱ्यांचा वॉच राहणार आहे.

शिक्षणात खंड पडू नये म्हणून अशा मुलांच्या शिक्षणाकडेही लक्ष दिले जाणार आहे. तसेच या मुलांच्या वडिलांच्या नावावर असलेली संपत्ती ही १८ वर्षांपर्यंत इतर कुणाच्या नावावर होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे.

०००००

कोरोनाने पालकत्व हिरावून घेतलेल्या बालकांचा शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत पाच मुलांच्या आई-बाबांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले तसेच १५ मुलांच्या आई-बाबांपैकी एका जणाचा मृत्यू झाला. या बालकांची संपूर्ण काळजी घेण्यात येणार आहे.

- सुभाष राठोड, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी

००

Web Title: Corona deprives parents of five children!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.