सुकांडा येथील कोरोना सद्य:स्थितीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:39 IST2021-05-16T04:39:47+5:302021-05-16T04:39:47+5:30
गेल्या काही दिवसांत सुकांडा गावातील ॲक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शंभरापेक्षा अधिक झाली आहे; तर चौघांचा कोरोना मृत्यूही झाला आहे. ...

सुकांडा येथील कोरोना सद्य:स्थितीचा आढावा
गेल्या काही दिवसांत सुकांडा गावातील ॲक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शंभरापेक्षा अधिक झाली आहे; तर चौघांचा कोरोना मृत्यूही झाला आहे. गावात दररोज दुहेरी संख्येत पॉझिटिव्ह रुग्ण आढळून असताना प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात होता. या संदर्भात ‘लोकमत’ने ११ व १३ मेच्या अंकात सुकांडा येथे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीबाबत आकडेवारीसह सविस्तर वृत्त प्रकाशित केले. त्याची तत्काळ दखल घेत मालेगावचे तहसीलदार रवी काळे यांनी तालुकास्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत सुकांडा गाव गाठून स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांकडून उपाययोजनांचा आढावा घेतला. कोरोना चाचणीला गती देऊन गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश दिले. सोबतच कोरोनाविषयक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. तलाठी, ग्रामसेवक यांनी गावात उपस्थित राहून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी काम करण्याचे निर्देश देण्यात आले. ग्रामस्थांनी नियमितपणे सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करावा, असे आवाहन तहसीलदारांनी यावेळी केले.
याप्रसंगी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पदमवार, पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने, तालुका आरोग्याधिकारी संतोष बोरसे, सरपंच कैलासराव घुगे, माजी पंचायत समिती सदस्य उल्हासराव घुगे यांच्यासह आरोग्यसेवक अंनिस कुरेशी, आशा स्वयंसेविका शशिकला अवचार, सुनीता आंधळे यांची उपस्थिती होती.