पोळ्यावर कोरोनाचे सावट; मिरवणुकीस मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:45 IST2021-09-06T04:45:32+5:302021-09-06T04:45:32+5:30

वाशिम : वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बळीराजा सज्ज झाला असला तरी यंदाही पोळा सणावर कोरोनाचे सावट ...

Corona bite on the hive; Prohibition of procession | पोळ्यावर कोरोनाचे सावट; मिरवणुकीस मनाई

पोळ्यावर कोरोनाचे सावट; मिरवणुकीस मनाई

वाशिम : वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बळीराजा सज्ज झाला असला तरी यंदाही पोळा सणावर कोरोनाचे सावट असल्याने शेतकऱ्यांच्या या उत्साहावर विरजण पडणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ६ सप्टेंबर रोजी असणारा पोळा सण साधेपणाने साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या.

शेती कामात शेतकऱ्यांना समर्थ साथ देणाऱ्या सर्जा-राजाप्रती पोळ्याच्या दिवशी कृतज्ञता व्यक्त केली जाते. गत काही वर्षांपासून पोळा सणावर कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीचे सावट आहे. गत वर्षी तर कोरोनाच्या सावटाखाली पोळा सण अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. यंदाही पोळा सणावर कोरोनाचे सावट आहे. यंदा बैल सजावटीच्या साहित्याच्या किमतीत २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा अतिरिक्त खर्च सहन करून शेतकऱ्यांनी सजावटीचे साहित्य खरेदी केले. मात्र, कोरोनामुळे पोळा सणावरही प्रशासकीय मर्यादा असल्याने शेतकऱ्यांना साधेपणानेच हा सण साजरा करावा लागणार आहे.

००००००००००००००००

बैल सजवून घरीच पूजा करावी

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ६ सप्टेंबर रोजी पोळा आणि ७ सप्टेंबर रोजी मारबत व तान्हा पोळा हे सण साधेपणाने साजरे करण्याबाबत जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी ४ सप्टेंबर रोजी आदेश जारी केले आहेत. हे सण साजरे करताना सर्वांनी मास्क लावणे, सामाजिक अंतर, सॅनिटायझर किंवा हॅण्डवॉशने नियमित हातांची स्वच्छता करावी, शेतकऱ्यांनी त्यांचे बैल सजवून घरीच पूजा करावी तसेच पोळानिमित्त गर्दी होणार नाही, याची खबरदारी सर्व ग्रामपंचायत आणि नगरपालिका प्रशासनाने घ्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

०००००००००००

बैल सजावट स्पर्धेवर मर्यादा

तान्हा पोळानिमित्त होणाऱ्या बैल सजावट स्पर्धा, मिरवणुका, शोभायात्रा आयोजित करण्यात येऊ नयेत. काही ठिकाणी मारबत व तान्हा पोळ्याच्या दिवशी काही धार्मिक विधी असल्यास अशा विधी कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत घरगुती स्वरुपात कराव्यात. ज्याठिकाणी धार्मिक परंपरा अंमलात आणण्यात येते, तेथे कोविड-१९ संदर्भात शासनाने निर्गमित केलेल्या नियमांचे, आदेशांचे तंतोतंत पालन करून कार्यक्रम घेण्यात यावेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Corona bite on the hive; Prohibition of procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.