उन्हाळी पिकांना पाणी सोडण्याबाबत अधिकाऱ्यांच्या निर्णयात विरोधाभास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:41 IST2021-03-19T04:41:13+5:302021-03-19T04:41:13+5:30
मालेगाव तालुक्यातील अडोळ प्रकल्पातून वाघी, खंडाळा, शेलगाव, ताकतोडा, रिठद, शिरपूर या रिसोड शहराला पिण्याच्या पाणीपुरवठा केला जातो. शिवाय हजारो ...

उन्हाळी पिकांना पाणी सोडण्याबाबत अधिकाऱ्यांच्या निर्णयात विरोधाभास
मालेगाव तालुक्यातील अडोळ प्रकल्पातून वाघी, खंडाळा, शेलगाव, ताकतोडा, रिठद, शिरपूर या रिसोड शहराला पिण्याच्या पाणीपुरवठा केला जातो. शिवाय हजारो शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी या प्रकल्पातून पाणी मिळते. यंदा प्रकल्पात जलसाठा भरपूर दिसत असल्याने यावर्षी उन्हाळी पिके ही शेतकऱ्यांना घेता येईल अशी परिस्थिती होती; परंतु रिठद शाखा अभियंत्यांनी २४ जानेवारी रोजी या प्रकल्पातील जलसाठा रिसोड, शिरपूर, शहरासह रिठद, ताकतोडा, शेलगाव, खंडाळा, वाघी या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी आरक्षित केल्याचे पत्र पाणी वापर संस्थांसह ग्रामपंचायतींना दिले. तसेच विनापरवाना पाणी उपसा करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला, तर ४ मार्च रोजी लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांनी प्रकल्पात ४४.९४ टक्के इतका जलसाठा असल्याने उन्हाळी पिकांना सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार असल्याचे एका पत्राद्वारे पाणी वापर संस्थांना कळविले. जर मार्च महिन्यामध्ये आडोळ प्रकल्पात पर्याप्त जलसाठा असल्याचे कार्यकारी अभियंता सांगताहेत, तर जानेवारी महिन्यात रिठदच्या शाखा अभियंत्यांनी प्रकल्पातील साठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आल्याचे पत्र सिंचन संस्थांना का दिले? असा प्रश्न उपस्थित होत असून, लघुपाटबंधारे विभागाच्या दोन अभियंत्यांनी वेगवेगळ्या संदर्भाचे पत्र दिलेल्या शेतकऱ्यांतही संभ्रम निर्माण झाला आहे.
--------------
कोट : पाटबंधारे विभागाच्या रिठद शाखा अभियंत्यांनी दिलेल्या पत्रामुळे अडोळ प्रकल्पाच्या डाव्या कालव्यापासून सातव्या गेटपर्यंत कुठल्याही शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकाची पेरणी केली नाही. अधिकाऱ्यांनी केबिनमध्ये बसून निर्णय घेता प्रत्यक्ष प्रकल्प पाहून निर्णय घ्यावे, अशी अपेक्षा आहे.
-बाळासाहेब वाघ,
शेतकरी, शिरपूर