कडक निर्बंधांमुळे घरांचे बांधकाम अर्धवट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:41 IST2021-05-19T04:41:56+5:302021-05-19T04:41:56+5:30

वाशिम : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने १४ एप्रिलपासून संचारबंदी लागू केली. तसेच जिल्हा प्रशासनाने ९ मेपासून कडक निर्बंध लागू ...

Construction of houses halted due to strict restrictions! | कडक निर्बंधांमुळे घरांचे बांधकाम अर्धवट !

कडक निर्बंधांमुळे घरांचे बांधकाम अर्धवट !

वाशिम : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने १४ एप्रिलपासून संचारबंदी लागू केली. तसेच जिल्हा प्रशासनाने ९ मेपासून कडक निर्बंध लागू केले. याचा थेट परिणाम घरांच्या बांधकामावर झाला असून, घरकुलांसह इतरही बांधकामे प्रभावित झाली आहेत.

जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात १४ एप्रिलपासून संचारबंदी लागू आहे. अत्यावश्यक कामांशिवाय इतर कामांसाठी नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. तथापि, नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत असल्याने जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी, बाजारपेठेत गर्दी होत असल्याने कोरोनाचा धोका वाढला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ९ ते १५ मेदरम्यान कडक निर्बंध लागू केले. १५ मेपासून २० मेपर्यंत निर्बंधाला मुदतवाढ दिली असून, यामधून किराणा, भाजीपाला, डेअरी, कृषी सेवा केंद्रे आदी सेवांना मुभा मिळाली. दरम्यान, गत एका महिन्यापासून संचारबंदी असल्याने बांधकाम क्षेत्र प्रभावित झाले आहे. कडक निर्बंध आणि संचारबंदीचा थेट परिणाम घरबांधकामावर झाला आहे. संचारबंदीमुळे बांधकाम मजूर घरातच आहेत. वाळू, सिमेंट आणि बांधकाम साहित्य मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे घरबांधणीचे काम पूर्णत: ठप्प झाले आहे. अनेकांनी मार्च-एप्रिल महिन्यांपूर्वी घर बांधण्याचे काम पूर्ण करण्याच्यादृष्टीने कामाला गती दिली होती. घरबांधणीचे काम अंतिम टप्प्यात आलेले असताना बांधकाम साहित्य मिळत नाही. कामगारांनाही काम नसल्याने उपासमारीची वेळ येत आहे.

....

कोट बॉक्स

सुुरुवातीला संचारबंदी आणि आता कडक निर्बंध यामुळे शहरांसह ग्रामीण भागात घरांचे बांधकाम ठप्प झाले आहे. एका महिन्यापासून काम बंद असल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. घरांचे बांधकाम सुरू केव्हा होणार, याची प्रतीक्षा आहे.

- रमेश देवकर, बांधकाम ठेकेदार

०००००

बांधकाम क्षेत्रात मागील २५ वर्षांपासून कार्यरत आहे. गेल्यावर्षी मार्च ते ऑगस्ट यादरम्यान कोरोनामुळे बांधकाम क्षेत्र प्रभावित होते. यंदा पुन्हा दुसरी लाट असल्याने गत एका महिन्यापासून बांधकाम क्षेत्र प्रभावित आहे. रोजगार नसल्याने घरची चूल कशी पेटवावी, असा प्रश्न आहे.

- अशोक बांगर, बांधकाम कामगार

००००

Web Title: Construction of houses halted due to strict restrictions!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.