भीमसंग्राम संघटनेच्या उपोषणाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:24 IST2021-02-05T09:24:41+5:302021-02-05T09:24:41+5:30
वाशिम : राज्यात सर्वत्र भूखंड खरेदी प्रक्रिया सुरू असताना सर्वसामान्यांच्या हितासाठी जिल्ह्यातही ही प्रक्रिया सुरु व्हावी, यासाठी भीमसंग्राम संघटनेने ...

भीमसंग्राम संघटनेच्या उपोषणाची सांगता
वाशिम : राज्यात सर्वत्र भूखंड खरेदी प्रक्रिया सुरू असताना सर्वसामान्यांच्या हितासाठी जिल्ह्यातही ही प्रक्रिया सुरु व्हावी, यासाठी भीमसंग्राम संघटनेने २६ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणाबाबत योग्य ती कार्यवाही करुन उपोषणकर्त्यांना उपोषणापासून परावृत्त करावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. परंतु, महसूल विभागाने या पत्राला केराची टोपली दाखवत उपोषणकर्त्यांना काहीच कळविले नाही. त्यामुळे अखेर निषेध नोंदवत २९ जानेवारी रोजी या उपोषणाची सांगता करण्यात आली.
जिल्हयात भूखंड खरेदी प्रक्रिया सुरू होण्यासाठी गेल्या वर्षभरापासून भीमसंग्राम संघटनेचा पाठपुरावा सुरु होता; मात्र प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने १९ जानेवारी रोजी संघटनेचे अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रजासत्ताक दिनापासून उपोषण सुरु करण्याचा इशारा दिला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी या निवेदनाची त्वरित दखल घेत त्याचदिवशी महसूल विभाग व उपविभागीय अधिकाऱ्यांना भूखंड प्रक्रियेबाबत कार्यवाही करण्यासह उपोषणकर्त्यांना उपोषणापासून परावृत्त करण्याचे आदेश दिले होते; मात्र कार्यवाही काहीच झाली नाही. चार दिवसांपासून उपोषण सुरु असताना कोणताही अधिकारी तेथे फिरकला नाही. त्यामुळे अखेर निषेध नोंदवत उपोषणाची सांगता करण्यात आल्याची माहिती डॉ. हिवाळे यांनी दिली. याप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचेही ते म्हणाले.