प्रशिक्षण पूर्ण केले; पण मेडिकल टाकण्याचे स्वप्न अधुरे राहिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:28 IST2021-07-10T04:28:18+5:302021-07-10T04:28:18+5:30
पांगरी नवघरे : गरजेपुरते शिक्षण घेऊन त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. संतश्रेष्ठ गजानन महाराजांचे दर्शन घेऊन मालेगावात मेडिकल सुरू करण्याचे ...

प्रशिक्षण पूर्ण केले; पण मेडिकल टाकण्याचे स्वप्न अधुरे राहिले
पांगरी नवघरे : गरजेपुरते शिक्षण घेऊन त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. संतश्रेष्ठ गजानन महाराजांचे दर्शन घेऊन मालेगावात मेडिकल सुरू करण्याचे स्वप्न त्यांनी रंगविले; मात्र त्यापूर्वीच अकोलानजीक घडलेल्या भीषण अपघातात त्यांची प्राणज्योत मालवली. धनंजय नवघरे आणि विशाल नवघरे या सख्ख्या चुलत भावांसह गावातीलच शुभम कुटे आणि मंगेश राऊत या चाैघांच्या अपघाती मृत्यूने पांगरी नवघरे येथे तीव्र शोककळा पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता वडिलांना मानसिक व आर्थिक आधार द्यावा, या हेतूने पांगरी नवघरे येथील धनंजय व विशाल या दोन सख्ख्या चुलत भावांनी मालेगाव येथे मेडिकल शिव क्लिनिकमध्ये सराव केला. तो पूर्ण झाल्यामुळे स्वतःचे मेडिकल टाकण्याची त्यांची धावपळ सुरू होती; मात्र त्यापूर्वी आस लागली ती ‘श्रीं’च्या दर्शनाची. त्यामुळे धनंजय आणि विशाल यांनी शुभम कुटे व मंगेश राऊत यांच्यासह एम.एच. ३७ बी ८२६२ या क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने शेगावकडे धाव घेतली. दर्शन झाल्यानंतर तेथून परतीचा प्रवास सुरू झाला. यादरम्यान बुलडाणा जिल्ह्यातील खामगावकडे जाणाऱ्या भरधाव वेगातील आयशरने (क्रमांक - एम.एच. १९ सीवाय ६४०४) वाहनास जबर धडक दिली. या भीषण अपघातात चारही युवकांचा जागीच मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेची वार्ता पांगरी येथे पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली.
.................
आप्तेष्टांचे अश्रू थांबता थांबेना
पांगरी नवघरे या एकाच गावातील चार युवकांचा अपघातात मृत्यू झाला. ही वार्ता गावात पसरताच गावकऱ्यांमधून हळहळ व्यक्त झाली. चाैघांच्याही घरी यामुळे स्मशानशांतता पसरली होती. आप्तेष्टांचे अश्रू थांबता थांबत नसल्याचे विदारक दृश्य पाहावयास मिळाले.