सिंचन प्रकल्पांचे भूसंपादन पूर्ण करा

By Admin | Updated: December 16, 2015 01:52 IST2015-12-16T01:52:36+5:302015-12-16T01:52:36+5:30

मुख्यमंत्र्यांचे आदेश; सौर कृषी पंपाचे लाभार्थी वाढविण्याच्या सूचना.

Complete land acquisition of irrigation projects | सिंचन प्रकल्पांचे भूसंपादन पूर्ण करा

सिंचन प्रकल्पांचे भूसंपादन पूर्ण करा

वाशिम: जिल्ह्यात भूसंपादनाअभावी रखडलेल्या सिंचन प्रकल्पांचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक जमिनींच्या संपादनाची कार्यवाही डिसेंबरअखेरपर्यंंत पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधानभवनातील सभागृहात १५ डिसेंबर रोजी झालेल्या वाशिम जिल्हा आढावा बैठकीत त्यांनी सदर आदेश दिले. यावेळी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, आमदार लखन मलिक, राजेंद्र पाटणी, अमित झनक, अप्पर मुख्य सचिव आनंद कुलकर्णी, व्ही. गिरीराज, सुजाता सैनिक, प्रभाकर देशमुख, अमरावती विभागाचे आयुक्त ज्ञानेश्‍वर राजूरकर, वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प, कृषी पंपांना वीज जोडणी, रस्ते, पीक कर्ज वाटप, पीक कर्ज पुनर्गठन, जलयुक्त शिवार अभियान आदी विषयांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील जलसिंचन प्रकल्पांविषयी मुख्यमंत्री म्हणाले की, जिल्ह्यातील ४0 अपूर्ण जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करावी. यामध्ये भूसंपादन, वनजमिनीबाबतचे प्रश्न मार्गी लावणे, रस्ते व विद्युत वाहिन्यांच्या स्थानांतरणाची कार्यवाही एका महिन्यात पूर्ण करून प्रकल्पांचे काम लवकरात लवकर सुरू होण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. सिंचन प्रकल्प व जलयुक्त शिवार अभियानामुळे उपलब्ध झालेल्या पाण्याचा शेतीसाठी उपयोग करण्यासाठी शेतकर्‍यांच्या कृषी पंपांना वीज जोडणी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कृषी पंपांना वीज जोडणी देण्यासाठी व सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणने अतिरिक्त पायाभूत आराखडा (इन्फ्रा)-२ च्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देऊन वीज जोडणीचे काम सुरू करण्यास प्राधान्य द्यावे. मार्च २0१६ पर्यंत कृषी पंप वीज जोडणीचे ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करावी. वीज जोडणीची कामे करण्यास दिरंगाई करणार्‍या अधिकार्‍यांवर व ठेकेदारांवर कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्या.

Web Title: Complete land acquisition of irrigation projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.