रोजगार हमी योजनेच्या कामांवर तक्रारींचा पाऊस
By Admin | Updated: December 25, 2015 03:04 IST2015-12-25T03:04:56+5:302015-12-25T03:04:56+5:30
जिल्हाभरातून तब्बल २६९ तक्रारी : यंत्रानेच उरकली कामे!

रोजगार हमी योजनेच्या कामांवर तक्रारींचा पाऊस
संतोष वानखडे /वाशिम : या ना त्या कारणावरून नेहमीच चर्चेत राहणारी रोजगार हमी योजना वाशिम जिल्हय़ात अनियमिततेमुळे वादाच्या भोवर्यात सापडत आहे. अनियमितता पाठ सोडत नाही; तोच जिल्हाभरातून रोहयोच्या कामांबाबत तब्बल २७९ तक्रारी प्राप्त झाल्याने, रोजगार हमी योजना टीकेचे लक्ष्य बनली आहे. बेरोजगारी कमी करणे आणि विकासात्मक कामांना चालना देणे या दुहेरी उद्देशाने शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अमलात आणली. बेरोजगारांना रोजगाराची हमी देणारी ह्यरोजगार हमी योजनाह्ण जिल्हय़ातील अनेक भागांत लाखो रुपयांच्या कमाईचे कुरण बनत असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त होत आहेत. पांदण रस्ते, सिंचन विहिरी, पेव्हर ब्लॉक, शेततळे, जलसंधारणाची कामे, दुष्काळ निवारणार्थची कामे या रोजगार हमी योजनेतून केली जातात. जुलै २0१५ पासून पेव्हर ब्लॉकच्या कामांवर बंदी लादली आहे. जलसंधारण व सिंचन विहिरींच्या कामांना प्राधान्य देऊन अपूर्ण असलेली पांदण रस्त्यांची कामे पूर्ण करण्याला जिल्हा प्रशासनाने हिरवी झेंडी दिली; मात्र पांदण रस्ते, शेततळे, सिंचन विहीर यासह अन्य कामांचा दर्जा सुमार असल्याच्या तसेच कामांत नियमितता नसल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या मग्रारोहयो कार्यालयाकडे प्राप्त होत आहेत. २३ डिसेंबरपर्यंत जिल्हाभरातून तब्बल २६९ तक्रारी आल्या. यामध्ये सर्वाधिक ६३ तक्रारी मंगरुळपीर तालुक्यातील असून, त्याखालोखाल ६0 तक्रारी मानोरा तालुक्यातून आल्या आहेत. रिसोड तालुका ४४, वाशिम ४२, मालेगाव ३२ आणि कारंजा तालुक्यातून २८ तक्रारींचा समावेश आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा कार्यालयाने चौकशीचा फास आवळणे सुरू केले आहे.