संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची तक्रार बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:45 IST2021-01-13T05:45:49+5:302021-01-13T05:45:49+5:30

कोरोना विषाणू संसर्गाचे संकट उद्भवण्यापूर्वी वाशिम जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी दलालाच्या माध्यमातून हैद्राबाद येथील कोल्ड स्टोरेजमध्ये २० हजार ८७७ ...

Complaint of orange growers evicted | संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची तक्रार बेदखल

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची तक्रार बेदखल

कोरोना विषाणू संसर्गाचे संकट उद्भवण्यापूर्वी वाशिम जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी दलालाच्या माध्यमातून हैद्राबाद येथील कोल्ड स्टोरेजमध्ये २० हजार ८७७ कॅरेटमध्ये ४६८९.६३ क्विंटल आणि वडोदरा (गुजरात) येथील कोल्ड स्टोरेजमध्ये ६५० कॅरेटमध्ये १४३ क्विंटल संत्रा साठवून ठेवला होता. मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यात कोल्ड स्टोरेजमधून संत्रा काढून तो विक्री करण्याचे नियोजन संबंधित शेतकऱ्यांचे होते; मात्र २५ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्याने संत्रा कोल्ड स्टोरेजमध्येच अडकून पडला.

कालांतराने कोरोना संकटाची परिस्थिती निवळल्यानंतर शेतकऱ्यांनी संबंधित दलालाकडे संत्र्याची मागणी केली असता, तो मिळाला नाही. याप्रकरणी मुंगळा येथील लक्ष्मण राऊत, महादा राऊत, संतोष मनोहर राऊत, संतोष केळे, संतोष बबन राऊत आणि मोतीराम सोनुने या शेतकऱ्यांनी मालेगाव पोलिसांत तक्रार दाखल करून संबंधित दलालाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली; परंतु तीन महिने उलटूनही पोलिसांनी कुठलीच हालचाल केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे.

................................

कोट :

शेतात अहोरात्र कष्ट करून पिकविलेला संत्रा सुरक्षित राहावा आणि चांगला दर मिळून फायदा व्हावा, या उद्देशाने हैद्राबादच्या कोल्ड स्टोरेजमध्ये संत्रा साठवून ठेवला होता; मात्र तो संबंधित दलालाने परस्पर विकला. याप्रकरणी तीन महिन्यांपूर्वी मालेगाव पोलिसांत तक्रार दाखल करूनही न्याय मिळालेला नाही.

- संतोष गजानन केळे, संत्रा उत्पादक शेतकरी, मुंगळा

Web Title: Complaint of orange growers evicted