शाळांमध्ये तक्रारपेटी बसविण्याच्या सूचना
By Admin | Updated: May 14, 2017 13:43 IST2017-05-14T13:43:49+5:302017-05-14T13:43:49+5:30
शाळांमध्ये तक्रार पेट्या बसविण्याच्या सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी आर.डी. तुरणकर यांनी दिल्या.

शाळांमध्ये तक्रारपेटी बसविण्याच्या सूचना
वाशिम : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत शाळांमध्ये करावयाच्या ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये तक्रार पेट्या बसविण्याच्या सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी आर.डी. तुरणकर यांनी दिल्या.
संबंधित शाळेत शिक्षण घेत असताना, विद्यार्थी व विद्यार्थिनींना व्यवस्थापन किंवा अन्य घटकांबाबत काही तक्रारी असू शकतात. या तक्रारींचे आॅन दी स्पॉट निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये तक्रारपेटया बसविण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने यापूर्वीच दिलेले आहेत. तथापि, अद्यापही काही शाळांमध्ये तक्रारपेटी बसविली नसल्याची बाब शिक्षण विभागाच्या निदर्शनात आली. या पृष्ठभूमीवर शिक्षण विभागाने एक पत्रक जारी करून सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना शाळांमध्ये तक्रारपेटी बसविण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या. शिक्षण विभागाच्या सूचनांनुसार वाशिम जिल्ह्यात या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी आर.डी. तुरणकर यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली. तक्रारपेटी बसविण्याची कार्यवाही शाळा व्यवस्थापन व शाळा प्रशासनाला करावी लागणार आहे. संबंधित प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेमध्ये तक्रारपेटी शाळेच्या दर्शनी भागात किंवा प्रवेशव्दाराच्या नजीक, संबंधितांच्या नजरेस येईल अशा रितीने लावण्याची कार्यवाही करावी लागणार आहे. प्रत्येक आठवडयात कामकाजाच्या शेवटच्या दिवशी ही तक्रारपेटी उघडण्यात येणार आहे. तक्रारपेटीत प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींची नोंद घेवून तक्रार निवारण करण्याबाबत तात्काळ आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही शिक्षण विभागाने दिलेल्या आहेत. येत्या शैक्षणिक सत्रापासून शाळेत तक्रारपेटी न बसविणाऱ्या शाळांविरूद्ध कारवाई केली जाणार आहे, असेही तुरणकर यांनी सांगितले.