पंतप्रधानांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद..
By Admin | Updated: September 6, 2014 00:03 IST2014-09-05T23:47:14+5:302014-09-06T00:03:30+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विद्यार्थ्यांंशी संवाद; वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

पंतप्रधानांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद..
वाशिम : शिक्षक दिनाचे औचित्य साधत ५ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरचित्रवाणी (टिव्ही), रेडीओ, इंटरनेटच्या माध्यमातून वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांंशी संवाद साधला.
शिक्षक दिनी पंतप्रधान मोदी विद्यार्थ्यांंना संदेश देणार असल्याने शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येलाच दूरचित्रवाणी, रेडिओ, संगणक व इंटरनेट, जनरेटरची व्यवस्था शाळांमध्ये करण्यात आली होती. वाशिम जिल्ह्यात प्राथमिकच्या १२८२ तर माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या २७४ अशा शाळा आहेत. जिल्हा परिषदेच्या ७७४ प्राथमिक शाळांपैकी १५९ शाळांमध्ये संगणकाची सुविधा आहे. उर्वरीत शाळांनी ऊसनवारीने रेडिओ व टिव्हीचा संच आणला होता. खासगी शाळांमध्ये मुख्याध्यापक व संस्थाचालकांनी दूरचित्रवाणी, रेडिओची व्यवस्था केली होती. पंतप्रधान मोदी यांचे भाषण ऐकण्याची उत्सुक ता विद्यार्थ्यांंना होती. या भाषणामुळे विद्यार्थ्यांंना पंतप्रधान मोदी यांचे विचार ऐकायला मिळाले. अनेक विद्यार्थ्यांंना भारताचे पंतप्रधान कोण आहेत, हेही यापूर्वी माहित नव्हते. शिक्षक दिनाच्या भाषणामुळे सर्वच विद्यार्थ्यांंना भारताचे पंतप्रधान कोण आहेत, याचीही माहिती मिळाली. मानोरा जुने शहरातील जिल्हा परिषद शाळेत टि.व्ही. संचाची व्यवस्था नसल्याने विश्वनाथ सुरजुसे यांच्या घरी विद्यार्थ्यांंनी टिव्हीवर पंतप्रधान मोदी यांचे भाषण ऐकले. ना.ना. मुंदडा विद्यालय मालेगाव, जिल्हा परिषद शाळा अमानी व केळी, जिल्हा परिषद शाळा भेरा, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा रिसोड, बालशिवाजी विद्या मंदिर वाकद, जिल्हा परिषद मराठी शाळा मालेगाव, वसंतराव नाईक विद्यालय मानोरा, शिवाजी विद्यालय रिसोड, शिवाजी विद्यालयन वाकद, जिल्हा परिषद विद्यालय मंगरुळपीर, भावना पब्लिक स्कूल देगाव, स्व. शंकरराव गवळी विद्यालय अमानी या शाळांसह जिल्ह्यातील जवळपास ९९ ट क्के शाळांमधील विद्यार्थ्यांंशी पंतप्रधान मोदी यांनी संवाद साधला.
** अमानीच्या शाळेवर रेंजच नव्हती..
मालेगाव तालुक्यातील अमानी जिल्हा परिषद शाळेत टिव्ही संचाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, सॅटेलाईटची रेंज व्यवस्थित नसल्याने टिव्हीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण दिसू शकले नाही. ३ वाजेपर्यंंत प्रतीक्षा करण्यात आली. मात्र, त्यानंतरही व्यवस्थित रेंज आली नसल्याने शेवटी ३ वाजतानंतर विद्यार्थ्यांंना आपापल्या घरी टिव्हीवर पंतप्रधानांचे भाषण ऐकण्यासाठी सुट्टी देण्यात आली. काही विद्यार्थ्यांच्या घरी टिव्ही नव्हती. त्यामुळे त्यांना या भाषणापासून वंचित राहावे लागले तर काही विद्यार्थ्यांना आपल्या वर्गमित्राच्या घरी जाऊन टिव्हीवर पंतप्रधानांचे भाषण ऐकले. जि.प. शाळा सुकांडा येथे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. शाळेजवळ राहणारे डॉ. प्रमोद घुगे यांनी इन्र्व्हटर देऊन विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळली.