बीएडच्या सामाईक सीईटीमुळे महाविद्यालयांची धांदल
By Admin | Updated: April 15, 2017 00:56 IST2017-04-15T00:56:01+5:302017-04-15T00:56:01+5:30
मार्गदर्शन वर्गांचे आयोजन: अर्ज दाखल करण्याची मुदत २६ एप्रिल

बीएडच्या सामाईक सीईटीमुळे महाविद्यालयांची धांदल
नाना देवळे - मंगरुळपीर
राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागाच्या वतीने आता बीएड अभ्यासक्रम प्रवेशासाठी राज्यभर एकच सीईटी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यापूर्वी शिक्षणसंस्थांच्या वतीने या अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी पूर्व परीक्षा बंद करण्यात आली असून, राज्यभरात होणाऱ्या आॅनलाइन पूर्वपरीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. आगामी २६ एप्रिल ही अर्ज स्वीकारण्याची शेवटची मुदत असल्याने विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी महाविद्यालयांची धांदल सुरू आहे.
राज्यात यापूर्वी बीएड अभ्यासक्रमासाठी दोन वेगवेगळ्या प्रवेशपूर्व परीक्षा घेतल्या जात असत. त्यामध्ये शासकीय महाविद्यालये आणि शासनाशी संलग्न असलेल्या खासगी महाविद्यालयांची स्वतंत्र सीईटी घेतली जायची, तसेच शासनाची मान्यता असलेल्या; परंतु संलग्नित नसलेल्या खासगी संस्थाकडून वेगळी प्रवेशपूर्व परीक्षा घेतली जायची; परंतु मागील वर्षांपासून बीएड अभ्यासक्रम हा दोन वर्षांचा करण्यात आला. उच्चशिक्षण विभागाने या संदर्भातील माहिती सर्व संबंधित महाविद्यालयांना कळविली असून, यासाठी खासगी शिक्षण संस्था आणि शासनाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमार्फत एकच सीईटी घेण्याचे ठरले आहे. राज्यभर १३ आणि १४ मे रोजी बीएड प्रवेशपूर्व परीक्षा घेतली जाणार असून, या परीक्षेचा निकाल ३१ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. बीए, बीकॉम आणि बीएससीच्या अंतिम वर्षाला प्रवेशित असलेले विद्यार्थीही या परीक्षेसाठी आॅनलाइन अर्ज सादर करू शकणार आहेत.
वाशिम जिल्ह्यात बीएड अभ्यासक्रमाची पाच महाविद्यालये आहेत. आता उच्च शिक्षण विभागाने बीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षेबाबत केवळ आॅनलाइन माहिती महाविद्यालयांना पाठविली असून, खासगी बीएड महाविद्यालयांकडून या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष वर्गाचे आयोजन करण्यात येत आहे.
बीएड प्रवेशपूर्व आॅनलाइन परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती कशी देणार, हा प्रश्न पडला आहे. शासनाने यावर्षीपासून राज्यात एकाच वेळी सीईटी परीक्षा घेण्याचे ठरविले. त्यामुळे परीक्षेबाबत विभागाने विद्यार्थ्यांना विस्तृत मार्गदर्शन करणे आवश्यक असून, आमच्या स्तरावर आम्ही विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग आयोजित करीत आहोत.
-ओमप्रकाश झिमटे (प्राचार्य),
यशवंतराव चव्हाण बीएड कॉलेज, मंगरुळपीर