लसीकरण मोहीम पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
By Admin | Updated: March 31, 2017 19:46 IST2017-03-31T19:46:58+5:302017-03-31T19:46:58+5:30
वाशिम: जिल्ह्यात २ एप्रिल रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. बुधवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पूर्वतयारीचा आढावा घेतला.

लसीकरण मोहीम पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
वाशिम : जिल्ह्यात २ एप्रिल रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून त्यानुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी बुधवारी आढावा घेतला. जिल्ह्यातील प्रत्येक बालकाला पोलिओची लस मिळावी, यासाठी आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
शून्य ते पाच वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पल्स पोलिओ लसीकरण होण्यासाठी मोहीम प्रभावीपणे राबवावी. शहरी व ग्रामीण पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेविषयी जनजागृती करा. त्यासाठी सर्व संबंधित शासकीय व निमशासकीय विभागांचे सहकार्य घेण्याच्या सूचना त्यांनी आढावा सभेत केल्यात. जिल्ह्यात ० ते ५ या वयोगटातील अपेक्षित बालकांची संख्या ग्रामीण भागात ९१ हजार १२३; तर नागरी भागात ३४ हजार ४६२ अशी एकूण १ लाख २५ हजार ५८५ इतकी आहे. या सर्व बालकांना पल्स पोलिओ लस देण्यासाठी ग्रामीण भागात ८२१ आणि नागरी भागात १२२ असे एकूण ९४३ पल्स पोलिओ लसीकरण बूथ स्थापन करण्यात आले आहेत. तेथे काम करण्यासाठी ग्रामीण भागात २ हजार १३७, नागरी भागात ३५९ असे एकूण २ हजार ४९६ इतके कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी ग्रामीण भागात १६२ व नागरी भागात २५ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.