कारंजाच्या पोलिस वसाहतीतील घरांची पडझड
By Admin | Updated: September 13, 2014 23:03 IST2014-09-13T23:03:07+5:302014-09-13T23:03:07+5:30
जनतेचे रक्षकच असुरक्षित : वसाहतीत मुलभूत सुविधांचा अभाव.

कारंजाच्या पोलिस वसाहतीतील घरांची पडझड
कारंजालाड : निसर्गाच्या सानिध्यात उंच भागावर वसलेल्या स्थानिक पोलीस वसाहतीमधील घरांची मोठय़ा प्रमाणात पडझड झाली आहे. त्यामुळे या वसाहतीत राहणार्या कर्मचार्यांच्या कुटुंबियांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. निवासस्थाने अतिशय मोडकळीस आल्याने ३५ निवासस्थानापैकी केवळ २१ कुटुंब या वसाहतीत राहत आहेत. ह्यसदरक्षणाय खलनिग्रहणायह्ण हे ब्रिद घेवून जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणार्या पोलीसांच्या सुरक्षिततेबाबत शासन किती बेफिकीर असू शकते याचा उत्तम नमुना म्हणजे येथील पोलीस वसाहत होय. पोलिस वसाहतीची निर्मिती ही स्वातंत्र्यपूर्व असून सद्यस्थितीत बोटावर मोजण्याइतकेच निवासस्थान राहण्या योग्य असल्याचे दिसुन येते. घराच्या भिंतींना तडे गेले असून घरावरील कवेलू फुटले आहेत. याशिवाय घराचा डोलारा सांभाळणारे लाकूडही कमकुवत झाले आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात या निवासस्थानांना धारा लागतात. तसेच दरवर्षीच्या पावसामुळे घरांचे दार, खिडक्या कुजल्याने त्याच्या फाटा तुटल्या आहेत. त्यामधून सरपटणारे प्राणी घरात घुसण्याची भीतीही कर्मचार्यांच्या कुटुंबियांना लागून आहे. पोलिस वसाहतीमधील कुटुंबियांसाठी शासनाने स्वतंत्र शौचालय उभारले आहे. मात्र सदर शौचालयही अखेरच्या घटका मोजत आहेत.