गावठाण मोजणीच्या ‘ड्रोन’ला ढगाळी वातावरणाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:41 IST2021-09-13T04:41:13+5:302021-09-13T04:41:13+5:30
सुनील काकडे वाशिम : जिल्ह्यात भूस्वामित्व योजनेअंतर्गत सर्व गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी करण्याची प्रक्रिया सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी ...

गावठाण मोजणीच्या ‘ड्रोन’ला ढगाळी वातावरणाचा फटका
सुनील काकडे
वाशिम : जिल्ह्यात भूस्वामित्व योजनेअंतर्गत सर्व गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी करण्याची प्रक्रिया सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला. असे असताना आजपर्यंत केवळ मालेगाव तालुक्यातील शंभर गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून उर्वरित तालुक्यांमध्ये हे काम अपूर्ण आहे. ‘ड्रोन’ला ढगाळी वातावरणाचा फटका बसत असून ही प्रक्रिया यामुळे अडचणीत सापडली आहे.
महाराष्ट्रातील सर्व गावांच्या गावठाणातील जमिनीचे जीआयएस प्रणालीद्वारे सर्वेक्षण आणि भूमापन स्वामित्व योजनेअंतर्गत करण्यात येत आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकाच्या मिळकतीचा नेमका नकाशा तयार होण्यासह सीमा निश्चित होतील. त्यामुळे मिळकतीचे नेमके क्षेत्र किती, हे कळणे सोयीचे होईल. मालकी हक्काची अभिलेख मिळकतपत्रिका तयार होईल. त्यामुळे ग्रामस्थांच्या नागरी हक्कांचे संवर्धन होण्यासोबतच मिळकत पत्रिकेमुळे घरावर कर्ज घेण्याची सुविधा देखील उपलब्ध होईल. त्यामुळे ड्रोनव्दारे गावठाण सर्वेक्षणाचे काम युद्धस्तरावर राबविण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत. प्रत्यक्षात मात्र ऐन पावसाळ्यात सुरू झालेल्या या मोहीमेला ढगाळी वातावरणाचा जबर फटका बसत आहे. यामुळेच गेल्या दोन महिन्यांत केवळ मालेगाव तालुक्यातील गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून इतर तालुक्यांमधील गावांमध्ये हे काम ठप्प आहे.
.................
स्वच्छ फोटोसाठी हवे स्वच्छ वातावरण
गावठाणातील मिळकतीचे सर्वेक्षण करण्यासाठी ‘ड्रोन’द्वारे स्वच्छ फोटो येणे आवश्यक आहे; मात्र सध्या सुरू असलेल्या पावसाळ्याच्या दिवसांत ढगाळी वातावरण कायम राहत असल्याने ही प्रक्रिया अडचणीत सापडली आहे.
शेतशिवारांमधील मोठमोठ्या झाडांखालचा भाग ‘ड्रोन’व्दारे टिपता येणे अशक्य आहे. अशावेळी संबंधित यंत्रणेतील चमूला त्या ठिकाणी जाऊन नोंदी घ्याव्या लागत आहेत. पाऊस झाल्यास ही बाब देखील अशक्य होत आहे.
..................
कोट :
ड्रोनद्वारे गावठाण मोजणी प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. याअंतर्गत मालेगाव तालुक्यातील गावांमध्ये सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले; मात्र ढगाळी वातावरणामुळे इतर गावांमध्ये हे काम संथ गतीने सुरू आहे. वातावरण चांगले राहिल्यास मोहीम झपाट्याने पूर्ण करता येणे शक्य होईल.
- शिवाजी भोसले, अधीक्षक, भूमी अभिलेख, वाशिम