पोलिस चौक्या बंद, गुन्हेगारी वाढली
By Admin | Updated: November 16, 2014 01:52 IST2014-11-16T01:47:34+5:302014-11-16T01:52:39+5:30
वाशिम शहरातील गुन्हेगारीचा आलेख वाढतोय: कर्तव्यावरील कर्मचा-यांना चौक्यांची अँलर्जी, प्रशासनाचे दुर्लक्ष.

पोलिस चौक्या बंद, गुन्हेगारी वाढली
नागेश घोपे/वाशिम
महाराष्ट्राच्या नकाशावर संवेदनशील म्हणून लालबत्तीत टिमटिमणार्या वाशिम शहरातील पोलिस चौक्या आजमितीला चक्क बुजगावणे बनल्या आहेत.पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष तथा कार्यरत बीट जमादारांना झालेल्या ह्यअँलर्जीह्णमुळे सदर चौक्यांची दुरवस्था झाली आहे. परिणामी, कायदा व सुव्यवस्थेवरील पोलिसांची पकड सैल झाली असून, शहरातील गुन्हेगारीचा आलेख दिवसागणिक वाढत आहे. शिवाजी चौकातील पोलिस चौकी वगळता इतर चौक्या अपवादानेच उघडल्या जातात. एवढेच नव्हे तर येथे कर्तव्य बजावत असलेले अधिकारी, कर्मचारी या चौक्यांकडे ढुंकुणही पाहत नसल्याचे सर्वश्रृत आहे. धक्कादायक बाब म्हणजे सौदागरपुरा, लाखाळा व क्रांती चौकातील पोलिस चौकीचे अस्तित्वच नामशेष झाले आहे. इतर चौक्याही सद्यस्थितीत शेवटचे आचके देत आहेत.
बसस्थानकावर पोलिस चौकीच नाही!
स्थानिक बसस्थानकावर अद्याप पोलिस चौकी उभारण्यात आलेली नाही. परिणामी, येथे दिवसागणिक चोरट्यांचा धुमाकूळ वाढत चालला आहे. शहर पोलिस स्टेशन प्रशासनाकडून येथे दररोज दोन पोलिसांची ड्युटी लावण्यात येत असते; परंतु सदर पोलिसांना बसण्यासाठी येथे चौकीच नसल्यामुळे त्यांना कर्तव्य बजावताना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
*जिल्हा रूग्णालयातील चौकी बेवारस
स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलिस प्रशासनाने येथे पोलिस चौकी निर्माण केली आहे. या चौकीवर काही पोलिसांची ड्युटीही लावण्यात येते; मात्र बर्याचवेळा येथील पोलिस कर्मचारी दांडी मारत असल्यामुळे पोलिस चौकी बेवारसच राहत असल्याचे दिसून येते.
*लाखाळ्यावरील चौकीचे भिजत घोंगडे
गत दोन वर्षांपूर्वी रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू असताना लाखाळा परिसरातील पोलिस चौकी जमिनदोस्त करण्यात आली होती. त्यावेळी हीच चौकी नगर परिषदेच्या खाली जागेवर बांधण्यात येणार असल्याचे बोलल्या जात होते; मात्र दोन वर्ष उलटून गेले असले तरी, अद्याप ही चौकी उभी राहिलेली नाही. या परिसरात शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय आहे. त्यामुळे विद्यालयात ज्ञानार्जन करणारे बहुतांश विद्यार्थी याच परिसरात राहतात. या विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच वादावादी सुरू असते. सन २00८ मध्ये अश्याच एका वादावादीच्या घटनेत संतोष वानखेडे या तरूणाची हत्या झाली होती. त्यानंतरही लाखाळा चौकात बर्याच घटना घडल्याचे सर्वश्रृत आहे. परिणामी, येथे पोलिस चौकीची नितांत गरज आहे. सदर चौकी सुरू करण्यात यावी, यासाठी या परिसरातील नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे; मात्र अद्याप याची दखल घेतल्या गेली नाही.