नागरिकांनी बुजविले हायवेवरील खड्डे
By Admin | Updated: March 13, 2015 01:51 IST2015-03-13T01:51:31+5:302015-03-13T01:51:31+5:30
निसर्ग मित्र मंडळाचा पुढाकार : दहा दिवसात २५ अपघात

नागरिकांनी बुजविले हायवेवरील खड्डे
वाशिम : अकोला हायवेवरील बाहेती हॉस्पिटलपासून ते चिंतामणी सर्व्हिसिंग नजीक रस्त्यावर जागोजागी पडलेल्या जीवघेण्या खड्डय़ांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडले. १ मार्च ते १0 मार्चपर्यंत या रस्त्यावरील खड्डय़ांमुळे २५ अपघात झाले. यामधील काही अपघात किरकोळ, तर काही गंभीर स्वरूपाचे होते. या अपघातात जखमी झालेल्यांना निसर्ग मित्र मंडळाच्यावतिने दवाखान्यात नेवून उपचार करण्यात आले. रस्त्यावरील खड्डयांमुळे होणारे अपघात पाहता येथील निसर्ग युवा मित्रमंडळाच्या पुढाकाराने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने ट्रॅक्टरव्दारे माती व मुरुम टाकून खड्डे बुजवले आहेत. या समाजसेवी कार्याबद्दल नागरीकांतून कौतुक होत आहे.
शहरातून जाणार्या हिंगोली अकोला हायवेवर नेहमी वाहनांची वर्दळ असते. त्यातच हा मार्ग शहरातून गेला असल्यामुळे इतर राज्यातून येणारे ओव्हरलोड वाहने व शहरातून जाणार्या वाहनांची या मार्गावर एकच गर्दी असते. या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून या खड्डय़ांवर दुचाकी उसळून अनेक अपघात होत आहेत. दुरवरुन हे खड्डे दिसत नसून जवळ गेल्यावरच वाहनधारकांना खड्डे दिसतात. त्यातच रात्रीच्या वेळेस अचानक खड्डयांतुन वाहने उसळून अपघात घडले आहेत. प्रवासी व नागरीकांना होणारा हा त्रास लक्षात घेवून येथील निसर्ग युवा मित्रमंडळाच्या पदधिकार्यांनी व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने ट्रॅक्टरव्दारे मुरुम व माती आणून खड्डे बुजविले. या कामी निसर्ग युवा मित्रमंडळाचे पदाधिकारी दशरथ वाटाणे, सागर वाटाणे, भुराराम चौधरी, भगवान, राम यांच्यासह नागरिकांनी पुढाकार घेतला.