दूध शीतकरण केंद्र बनले ‘विश्रामगृह’
By Admin | Updated: September 9, 2015 01:52 IST2015-09-09T01:52:41+5:302015-09-09T01:52:41+5:30
‘लोकमत स्टिंग ऑपरेशन’मध्ये आढळले दूध शीतकरण केंद्राचे बहुतांश कर्मचारी गैरहजर.
_ns.jpg)
दूध शीतकरण केंद्र बनले ‘विश्रामगृह’
वाशिम : काटा रोडस्थित येथील शासकीय दूध शीतकरण केंद्राचा वापर सद्या चक्क 'विश्रामगृह' म्हणून केला जात असल्याची गंभीर बाब लोकमतने मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी केलेल्या 'स्टिंग ऑपरेशन'दरम्यान उघड झाली. इनमिन सहा कर्मचारी कार्यरत असलेल्या या केंद्रात मंगळवारी केवळ केंद्रप्रमुख वाय.एस.चौधरी हे आढळून आले. ते देखील अकोला-वाशिम 'अपडाऊन'ने थकल्यामुळे केंद्राच्या कार्यालयात झोपलेले होते.
पूर्वी वाशिम जिल्ह्यात वाशिम आणि कारंजा असे दोन शीतकरण केंद्र कार्यान्वित होते; मात्र गत चार वर्षांंपूर्वी कारंजाचे केंद्र बंद पडले. वाशिममध्ये सुरु असलेले शीतकरण केंद्रदेखील सध्या नावालाच उरले आहे. काटा रोडवर अगदी मोक्याच्या ठिकाणी शासकीय दूध शीतकरण केंद्राची सहा एकर जागा आहे. त्यात एका ठिकाणी असलेल्या इमारतीत दूध थंड केले जाते. इमारतीची आतून पाहणी केली असता, सर्वत्र घाण आणि कचरा साचलेला दिसून आला. दूध थंड करण्याचे दोन मोठे यंत्र गेल्या १५ ते १७ वर्षांंपासून नादुरुस्त असल्यामुळे सद्या त्याचा वापर पाणी ठेवण्यासाठी केला जात असल्याचे पाहावयास मिळाले. या केंद्रात चतुर्थ श्रेणीचे पाच कर्मचारी कार्यरत असताना स्वच्छतेकडे गेल्या अनेक महिन्यांपासून लक्ष पुरविल्या गेले नाही. यामुळेच इमारतीच्या आतील भागात ठिकठिकाणी जाळे पसरल्याचे आढळून आले. केंद्रात कार्यरत केंद्रप्रमुख चौधरी यांच्यासह चतुर्थ श्रेणीचे चार कर्मचारी दैनंदिन अकोला-वाशिम 'अपडाऊन' करतात. मंगळवारी मात्र सर्वच चतुर्थश्रेणी कर्मचार्यांनी कार्यालयीन कामकाजास चक्क 'दांडी' मारुन घरीच आराम करणे पसंद केल्याची माहिती मिळाली.
सध्या वाशिमच्या दूध शीतकरण केंद्रात जिल्ह्यातील मालेगाव, शिरपूर, रिसोड, मंगरुळपीर, जांभरुण नावजी, कळंबा महाली, फाळेगाव थेट, वाळकी आदी गावांमधून दररोज १000 लीटर दूध येत आहे; मात्र अकोला येथे एवढे दूध पाठवित असताना 'ट्रान्सपोर्ट'चा खर्च परवडणारा नसल्याने दोन दिवसाचे संकलित झालेले दूध पाठविण्यात येत असल्याची बाबदेखील 'स्टिंग ऑपरेशन'मध्ये निदर्शनास आली.