मिरची, मसाल्यांना महागाईचा ठसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:40 IST2021-03-21T04:40:35+5:302021-03-21T04:40:35+5:30

कोरोना विषाणू संसर्ग संकटामुळे गतवर्षीपासून सर्वच उद्योगधंदे बहुतांशी डबघाईस आले आहेत. मध्यंतरी व्यवसाय पूर्वपदावर येत असतानाच गेल्या काही दिवसांपासून ...

Chilies, spices hit by inflation | मिरची, मसाल्यांना महागाईचा ठसका

मिरची, मसाल्यांना महागाईचा ठसका

कोरोना विषाणू संसर्ग संकटामुळे गतवर्षीपासून सर्वच उद्योगधंदे बहुतांशी डबघाईस आले आहेत. मध्यंतरी व्यवसाय पूर्वपदावर येत असतानाच गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दुकाने लवकरच बंद केली जात असल्याने व्यापारी वर्ग हैराण आहे. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य कुटुंबांवर झाला असून आर्थिक संकट निर्माण झाले आहे. अशातच गॅस-सिलिंडर, पेट्रोल, डिझेल, खाद्यतेलासह आता मिरची, धने, जिरे, तीळ, खसखस, खोबरे, मेथी, हळद, मोहरी, लवंग, घोडफुल, बदामफुल, वेलदोडे, बडीशेप, जायपत्री, नामेश्वर, त्रिफळ यासह इतरही स्वरूपातील मसाल्यांचे दर वाढल्याने नागरिक त्रस्त झाले असून गृहिणींमधून याप्रती नाराजीचा सूर उमटत आहे. शासनाने वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी ठोस उपाययोजना आखाव्या, अशी मागणीही यानिमित्ताने होत आहे.

.................................

मिरची येते आंध्रातून

वाशिम जिल्ह्यात आंध्र प्रदेशमधून मिरचीची आयात केली जाते. डिझेलचे दर वाढल्याने त्याचा थेट परिणाम होत वाहतुकीच्या दरातही वाढ झाली आहे. यामुळेच लाल मिरचीचे भाव वाढल्याची माहिती काही व्यापा-यांनी दिली.

मसालावर्गीय साहित्याची आयात विशेषत: केरळ राज्यातून केली जाते. त्यालाही गेल्या काही दिवसांपासून वाहतूक दरात वाढ झाल्याचा फटका बसलेला आहे. यामुळे मसाल्याचे दर वाढले असून नागरिक त्रस्त आहेत.

...............

गृहिणी म्हणतात...

महागाईवर नियंत्रण मिळविण्यात विद्यमान सरकार सपशेल अपयशी ठरलेले आहे. स्वयंपाकासाठी लागणा-या गॅस-सिलिंडरच्या दरात गेल्या काही महिन्यात प्रचंड प्रमाणात वाढ केली. त्यानंतर खाद्यतेलाचे वाढलेले दर अद्याप किंचितही कमी झालेले नाहीत आणि अशातच मिरची, मसाल्याचेही दर वाढल्याने मासिक बजेट पूर्णत: विस्कळीत झाले आहे.

- भावना सोमटकर

....................................

वाशिम जिल्हा हा आजही ग्रामीण भागात मोडतो. या जिल्ह्यात कुठलेही मोठे उद्योगधंदे नाहीत. अनेकांच्या हाताला काम मिळत नाही. अशा स्थितीत गेल्या काही महिन्यांपासून अन्य साहित्यांसोबतच मिरची, मसाल्याचेही दर आकाशाला भिडल्याने जगणे कठीण झाले आहे. पतीकडून दरमहा मिळणा-या पैशातून पूर्वी घर चालायचे; मात्र आता बजेट बिघडले आहे.

- करुणा नरवाडे

Web Title: Chilies, spices hit by inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.