बालदिनापासून बाल स्वच्छता मोहिमेचा श्रीगणेशा
By Admin | Updated: November 14, 2014 01:31 IST2014-11-14T01:31:01+5:302014-11-14T01:31:01+5:30
वाशिम जिल्ह्यातील शाळांमध्ये राबविली जाणार स्वच्छता मोहीम, यशस्वीतेची जबाबदारी सोपविली शिक्षकांवर.

बालदिनापासून बाल स्वच्छता मोहिमेचा श्रीगणेशा
वाशिम : शाळांमध्ये स्वच्छता आणि आरोग्य विषयाकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी राज्यभरात १४ ते १९ नोव्हेंबरदरम्यान बालस्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांनी या मोहिमेंतर्गतच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक स्थानिक शिक्षण विभागाकडे पाठविले आहे. ही मोहीम यशस्वी करण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. शिक्षकांना या मोहिमेच्या अंमलबजावणीचा अहवाल शिक्षण विभागाकडे सोपवावा लागणार आहे.
या मोहिमेच्या माध्यमातून स्वच्छ भारत, हे ध्येय २0१९ पयर्ंत साध्य करण्यात बालकांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. मोहिमेद्वारे स्वच्छ पाणी, परिसर स्वच्छता आणि त्याद्वारे शाळेत आरोग्यदायी व प्रफुल्लित वातावरण निर्माण होईल, असे सरकारला अभिप्रेत आहे. मोहिमेंतर्गत जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत स्तरावर विविध कार्यक्रम घ्यावयाचे आहेत. वातावरणनिर्मितीसाठी स्वच्छता व आरोग्यविषयक संदेश देणारे बॅनर, होडिर्ंग्ज, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स फलक कल्पकरीत्या तयार करून विविध कार्यालयांच्या मुख्यालयी आणि कार्यालयाच्या दर्शनी भागात लावायचे आहेत. मोहिमेच्या प्रारंभी अथवा मोहिमेत स्वच्छता व आरोग्यविषयक जनजागृती करणारे संदेश देणार्या विविध स्पर्धा घ्यावयाच्या आहेत. त्यात चित्रकला, निबंध, घोषवाक्ये, गायन, रांगोळी आदींचा समावेश असेल. शिक्षक व मुख्याध्यापकांनी स्वच्छता आणि आरोग्यविषयक संदेश, त्यावर आधारित गोष्टी नियमित परिपाठावेळी सांगायच्या आहेत. स्वच्छताविषयक प्रार्थना, गीते, क्रमिक पुस्तकांमधील स्वच्छताविषयक संदर्भ याद्वारे मुलांशी संवाद साधायचा आहे. बालके जेवणापूर्वी व नंतर, स्वच्छतागृहाचा वापर केल्यावर हात स्वच्छ धूत असल्याची खात्री करावयाची आहे. हात धुण्याच्या जागी साबण, पाणी, हातरुमाल उपलब्ध असल्याची खात्री करावयाची आहे.