दोन शिक्षणाधिका-यांसह संस्थाचालकावर फसवणुकीचा गुन्हा

By Admin | Updated: January 3, 2015 01:22 IST2015-01-03T01:22:33+5:302015-01-03T01:22:33+5:30

बनावट दस्तावेजाद्वारे पदनिर्मिती.

Cheating Criminal With Two Education Officers | दोन शिक्षणाधिका-यांसह संस्थाचालकावर फसवणुकीचा गुन्हा

दोन शिक्षणाधिका-यांसह संस्थाचालकावर फसवणुकीचा गुन्हा

वाशिम : तालुक्यातील अनसिंग येथील प.दी. जैन विद्यालयामध्ये कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा परिचर व शिपाई अशी तीन पदे बनावट दस्तावेज बनवून निर्माण केली व त्याठिकाणी तिघांची नेमणूक केल्याचे शिक्षण उपसंचालकांना चौकशी दरम्यान निदर्शनास आले.
याप्रकरणी अमरावतीचे शिक्षण उपसंचालक राम पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनसिंग पोलिसांनी दोन शिक्षणाधिकारी, संस्था अध्यक्ष व मुख्याध्यापकासह ११ जणांवर १ जानेवारी रोजी भादंविचे कलम ४२0, ४0९, ४६५, ४६८, ४७१, २0१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.
वाशिम जिल्हा परिषदेचे विद्यमान माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय तेलगोटे, सन २0१२-१३ मध्ये कर्तव्यावर असलेले माध्यमिक शिक्षणाधिकारी विश्‍वास लबडे, अनसिंग येथील स्वादवाद एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष धरमचंद वाळली, प.दी. जैन विद्यालयाच्या शाळा समितीचे सदस्य रूपचंद वाळली, किरणकुमार वाळली, संजय वाळली, सुभाष कदम, मुख्याध्यापक अरविंद राठोड यांनी संगनमत करून कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा परिचर व शिपाई अशी तीन पदे बनावट दस्तावेज बनवून निर्माण केली व त्याठिकाणी स्वप्निल वाळली, संजय नवघरे व केशव कालापाड यांची नियुक्ती केली. नेमणूक करण्यात आलेल्या तीन कर्मचार्‍यांनी वेतनापोटी शासनाकडून २७ हजार रूपयांची उचल करून अपहार केला.
उपरोक्त शिक्षणाधिकारी, संस्था अध्यक्ष, शाळा समिती सदस्य, मुख्याध्यापक व कर्मचार्‍यांनी संगनमत करून शासनाची फसवणूक केली व कागदपत्रे गहाळ करून पुरावे नष्ट केले, अशा प्रकारची फिर्याद शिक्षण उपसंचालक पवार यांनी अनसिंग पोलीस स्टेशनमध्ये नोंदविली .
या फिर्यादीवरून पोलिसांनी भादंविचे कलम ४२0, ४0९, ४६५, ४६८, ४७१, २0१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सी.आर. कदम करीत आहेत.

Web Title: Cheating Criminal With Two Education Officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.