लाखोंचे श्रद्धास्थान गोवर्धन येथील चंदनशेष मंदिर

By Admin | Updated: August 1, 2014 02:18 IST2014-08-01T02:17:51+5:302014-08-01T02:18:46+5:30

नागपंचमी विशेष रिसोड तालुक्यातील देवस्थान

Chandanshal Temple at Govardhan Temple | लाखोंचे श्रद्धास्थान गोवर्धन येथील चंदनशेष मंदिर

लाखोंचे श्रद्धास्थान गोवर्धन येथील चंदनशेष मंदिर

निनाद देशमुख /रिसोड
रिसोडपासून जवळपास २५ किलोमीटर अंतरावरील गोवर्धन गाव. या गावाजवळ ढोणगाव रस्त्यावर चंदनशेष महाराजांचे भव्य मंदिर आहे. या ठिकाणी नागपंचमीनिमित्त जवळपास एक लाख भाविक गोवर्धन या गावी येथून नागदेवतांच्या दर्शनाचा लाभ घेण्याकरिता येत असतात. जिल्हय़ातील तसेच जिल्हय़ाबाहेरील चंदनशेष महाराजांचे मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते.
या मंदिराबाबत गावातील ज्येष्ठ लोकांच्या अनुभवानुसार सुमारे दीडशे वर्षांपूर्वी रावजी बापू वाघ हे नागपंचमीच्या दिवशी शेतात जमिनीची मशागत करीत असताना त्यांना निगरुडीच्या झाडाखाली साप चावला होता; परंतु त्यांचे विष उतरुन ते जिवंत राहिले. जवळपास पंधरा दिवसानंतर नागदेवता त्यांच्या स्वप्नामध्ये आली. तिने नागदेवतेचे मंदिर स्थापन कर, असा उपदेश दिला. यापुढे त्यांनी तेथे नागदेवता स्थापून चंदनशेष महाराज या नागदेवतेची मनोभावे सेवा केली, अशी अख्यायिका आहे. त्यांच्या घरातील जवळपास तीन पिढय़ानपासून ही सेवा कायम चालविली जात असल्याचे गावातील नागरिक रमेशराव वाघ यांनी सांगितले. पुढे नागोराव वाघ यांनी मंदिराची उभारणी केली.
निसर्गसौंदर्यांनी वेढलेल्या मंदिराच्या समोरच जुने वडाचे झाड असून, पंचक्रोशिसह परजिल्हय़ातीलही कोणालाही सर्पदंश झाल्यास त्यांनी डोळय़ावर दगड ठेवल्यास किंवा जात्याची पाळ देऊन मागे न पाहता चंदनशेष महाराजांकडे गेले तर विषाचा उतारा होऊन माणूस जिवंत राहतो, अशी या परिसरातील नागरिकांची श्रद्धा आहे.
फार वर्षांपूर्वी या ठिकाणी घनदाट जंगलात फार मोठे वारुळ होते. या गावातील लोक आपल्या घरामध्ये साप निघाल्यास मंदिर परिसरातील वाळू आणून घराभोवती टाकल्यास साप घरात येत नाही, असे येथील ग्रामस्थांची श्रद्धा आहे. नागपंचमीच्या दिवशी या गावात शेतातील कुठलेही मशागतीचे काम ग्रामस्थ करीत नाहीत. शेतात मशागतीचे काम केल्यास नागदेवतेला इजा होऊ शकते, असे गावातील लोक सांगतात. नागपंचमीच्या दिवशी येथे रिसोड तालुक्यासहित अकोला, बुलडाणा, परभणी, हिंगोली या ठिकाणाहून जवळपास एक दीड लाख भाविक नागदेवतेच्या दर्शनासाठी येतात. या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. या ठिकाणी लोकप्रतिनिधीच्या निधीतून दोन सभा मंडपाची उभारणी झाली आहे. यात्रेनिमित्त भाविकांची रेलचेल पाहून पोलिस प्रशासन बंदोबस्तासाठी तैनात असते. गावातील नायबराव वाघ व सदाशिवराव वाघ हे आपला वारसा प्रमाणे मंदिराची अखंड सेवा करीत असतात. चंदनशेष महाराजांचे हे मंदिर पंचक्रोशितील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते.

Web Title: Chandanshal Temple at Govardhan Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.