प्रमुख पक्षांसमोर गटबाजी शमविण्याचे आव्हान
By Admin | Updated: October 9, 2014 00:46 IST2014-10-09T00:46:36+5:302014-10-09T00:46:36+5:30
दुस-या पक्षातील असंतुष्टांकडे विरोधकांनी वळविला मोर्चा.

प्रमुख पक्षांसमोर गटबाजी शमविण्याचे आव्हान
संतोष वानखडे / वाशिम
कोणत्याही परिस्थितीत विजय मिळविण्याच्या इराद्याने निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या प्रमुख राजकीय पक्षांसमोर आता असंतुष्टांना शांत ुबसविण्याबरोबरच पक्षांतर्गतची गटबाजी शमविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. विरोधकांपेक्षा स्वकीयांकडून ऐनवेळेवर धोका नको, म्हणून प्रत्येक पक्ष सावधगिरीने पावले उचलत असल्याचे दिसून येत आहे. युती-आघाडीतील घटस्फोटामुळे राजकीय समिकरणं पार बदलून गेली आहेत. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रत्येक प्रमुख राजकीय पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरला आहे. स्वत:ची राजकीय शक्ती दाखवून देण्याच्या नावाखाली प्रत्येक पक्षाने एका झेंड्याखाली एकवटण्याचे आवाहन आपले कार्यकर्ते व पदाधिकार्यांना केले आहे. विरोधकांपेक्षा स्वकीयाकडूनच ऐनवेळेवर जास्त दगाबाजी नको, म्हणून अंतर्गत गटबाजी, असंतुष्टांवर प्रत्येकजण बारीक नजर ठेवून आहे. जिल्ह्यातील राजकीय स्थितीचा सद्य:स्थितीत विचार केल्यास, येथे प्रत्येक पक्षाला कमी-अधिक प्रमाणात असंतोषाचा आणि गटबाजीेचा डाग लागला असल्याचे दिसून येते. वाशिम, रिसोड व कारंजा या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील अंतर्गत गटबाजी शमविण्याबरोबरच असंतुष्टांना संतुष्ट करण्याची कसरत प्रमुख पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना करावी लागत आहे. सध्या निवडणूक प्रचार दुसर्या टप्प्यात पोहोचला आहे. प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवाराच्या विजयाचे गणित मांडत आहे. इतर पक्षातील असंतुष्ट कार्यकर्ते आणि मोठे मासे गळाला लागतात काय, हे प्रत्येक पक्षाकडून आजमावून पाहिले जात आहे. परिणामी, पक्षांतर्गत असंतोष आणि अंतर्गत गटबाजीकडे प्रत्येक पक्ष गांभीर्याने लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रामुख्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. इतर पक्षांच्या तुलनेत याच दोन पक्षामध्ये गटबाजीही जास्त प्रमाणात आहे. दोन्ही काँग्रेसमध्ये प्रत्येकी दोन हेवीवेट नेते आपापले राजकीय वजन राखून आहेत. राष्ट्रवादीच्या एका हेवीवेट नेत्याने तर पक्षाच्या उमेदवाराविरोधातच निवडणूक आखाड्यात उतरुन दंड थोपटले आहेत. परिणामी, त्यांच्या सर्मथकांमध्येही दरी निर्माण झाली असल्याची चर्चा आहे. पक्षामधील गटबाजी शमविण्याचे आव्हान ज्येष्ठ नेत्यांसमोर उभे ठाकले आहे.