घरोघरी बैलांची पूजा करून पोळा सण साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:50 IST2021-09-08T04:50:05+5:302021-09-08T04:50:05+5:30
काजळेश्वर येथे दरवर्षी पोळा सण मोठ्या प्रमाणात हर्षोल्लासात साजरा करण्यात येतो. पोळा ज्याठिकाणी भरविण्यात येतो, त्याठिकाणी आंब्याचे तोरण बांधून ...

घरोघरी बैलांची पूजा करून पोळा सण साजरा
काजळेश्वर येथे दरवर्षी पोळा सण मोठ्या प्रमाणात हर्षोल्लासात साजरा करण्यात येतो. पोळा ज्याठिकाणी भरविण्यात येतो, त्याठिकाणी आंब्याचे तोरण बांधून सजविलेल्या बैलांना एका रांगेत उभे केले जाते. त्यानंतर मानाच्या बैलाचे पूजन झाल्यानंतर पोळा फोडला जातो. यावेळी गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमते; मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीप्रमाणे यंदाही या परंपरेत बदल करून साधेपणाने पोळा साजरा करण्यात आला.
सोमवारी पुरणपोळीचा नैवेद्य देऊन बैलांची पूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर बैलांना गावात घरोघरी नेण्यात आले. प्रशासनाने घालून दिलेल्या कोरोनाविषयक नियमांचे पालन करून गावात पोळा हा सण शांततेत साजरा करण्यात आला.
..............
दरवर्षी काजळेश्वर येथे पोळा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. आबालवृद्धांची पोळ्यात तोबा गर्दी होते. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार प्रामुख्याने टाळण्यात आला. हा सण गावात साधेपणाने व शांततेत साजरा करण्यात आला.
- दिगांबर उपाध्ये, शेतकरी
.................
रुढी-परंपरेनुसार मानकरी तुळशीराम उपाध्ये यांनी त्यांच्या घरासमोर बैलाची पूजा केली. आरतीनंतर उपस्थितांना प्रसाद वाटप करण्यात आला. यादरम्यान शासकीय आदेशाचे पालन करण्यात आले.
अंबादास उपाध्ये, अध्यक्ष विठ्ठल संस्थान, काजळेश्वर