वृक्षास राखी बांधून वाढदिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:44 IST2021-08-27T04:44:20+5:302021-08-27T04:44:20+5:30
रिसोड येथील उपकोषागार कार्यालयात कार्यरत असताना कार्यालयाच्या परिसरात वृक्षप्रेमी मधुकर अंभोरे यांनी जवळपास बारा वर्षांपूर्वी न्यायालयाच्या बाजूकडून वडाची ...

वृक्षास राखी बांधून वाढदिवस साजरा
रिसोड येथील उपकोषागार कार्यालयात कार्यरत असताना कार्यालयाच्या परिसरात वृक्षप्रेमी मधुकर अंभोरे यांनी जवळपास बारा वर्षांपूर्वी न्यायालयाच्या बाजूकडून वडाची झाडे लावली होती, ती केवळ लावलीच नाही तर त्यांचे अतिशय काळजीपूर्वक संवर्धन केले. आज ती वडाची झाडे मोठी झाली असून, उन्हाळ्यात आपल्या न्यायालयीन किंवा तहसील संबंधित कामानिमित्त येणारी माणसे त्या झाडाच्या सावलीला बसताना दिसून येत आहेत. झाड लावल्यापासून आजपर्यंत वृक्षप्रेमी मधुकर अंभोरे व त्यांचे सहकारी त्या झाडांचा दरवर्षी वाढदिवस थाटामाटात साजरा करतात. चार वर्षांपूर्वी कोषागार कार्यालयातून सेवानिवृत्त झाल्यानंतर झाडे लावण्याचा छंद कायम ठेवीत अंभोरे यांनी मेहकर फाट्यावरील फॉरेस्ट विभागाच्या ताब्यात असलेल्या जागेवर त्यांनी वडाची झाडे लावली. सुरुवातीला फॉरेस्ट विभागाकडून त्यांना विरोध झाला, परंतु आपले काम प्रामाणिक असून जनहिताचे आहे, हा विश्वास मनात ठेवून त्यांनी अधिकाऱ्यांना पटवून सांगितले. अधिकाऱ्यांनीसुद्धा त्यांच्या प्रामाणिकपणे करीत असलेल्या कार्याबद्दल झाडे लावण्यास परवानगी दिली. झाडे लावलीच नाहीत तर खडकाळ भाग असल्यामुळे भर उन्हाळ्यात स्वतःच्या पेन्शनच्या रकमेतून टँकरद्वारे पाणीसुद्धा टाकले, कुंपण लावून त्या वृक्षांना त्यांनी जोपासले. या कार्यात त्यांच्या सहचारिणी बेबीनंदा मधुकर अंभोरे आणि निरंकारी सत्संग परिवारातील सदस्यांचे त्यांना नेहमीच योग, सहकार्य मिळते.